पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

व्रतेवैकल्ये, ती संसारनिंदा, धननिंदा, भौतिक ज्ञानाची निंदा,– हे अधर्मशास्त्र या विनाशाच्या बुडाशी आहे असे मला निश्चित वाटते. शिवछत्रपती व समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने रूढ धर्मातले हे दोष जाणून त्यांतील बरेच नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला ते वर सांगितलेच आहे. त्यामुळेच या भूमीत एक अद्भुत शक्ती निर्माण होऊन तिने शंभर-दीडशे वर्षांत हिंदुस्थान आक्रमिला हे खरे; पण त्या दोन महापुरुषांनी घडविलेल्या क्रांतीची तत्त्वे समाजात दृढमूल करून टाकण्याचे कार्य कोणीच न केल्यामुळे त्यांचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत गेला. खुद्द शिवछत्रपतींच्या वारसांनाच त्या महाराष्ट्रधर्माची कल्पना आली नाही आणि रामदासांच्या एकाही शिष्याला त्यांच्या प्रवृत्ति- धर्माचे आकलन झाले नाही, यापरते दुर्दैव ते काय ? वास्तविक या वेळी शास्त्री- पंडित, आचार्य, भिन्नभिन्न संप्रदायांचे धुरीण, मठाधिपती यांनी शिवसमर्थांचा नवा धर्म- महाराष्ट्र धर्म- जाणून घेऊन अखिल महाराष्ट्रात व भारतात कथा, कीर्तने, प्रवचने, पुराणे, भारुडे, लळिते, यांच्या द्वारा त्याचा अहोरात्र प्रचार करावयास हवा होता. पण ते बाजूलाच राहिले आणि शास्त्री, हरिदास, पुराणिक आचार्य, सर्व सर्व त्या जुन्या व्यक्तिनिष्ठ, परलोकवादी, दैववादी कर्मकांडात्मक धर्माचेच कीर्तन करीत राहिले. चार-पाचशे वर्षांची जुनी परंपराच त्यांनी चालू ठेविली. राज्य, साम्राज्य, क्षात्रधर्म, पराक्रम, विजीगिषा, यांचा कसलाही संबंध त्यांनी धर्माशी येऊ दिला नाही.

नवे संस्कार नाहीत :
 बाजीरावाला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली तेव्हा प्रतिनिधी, अमात्य, सुमंत, सेनापती या सर्वांना हा लहान पोर आपल्या डोक्यावर आणून बसविला याचे वैषम्य वाटले. यामुळे त्याच्याशी सहकार्य करण्याचे, त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्यांनी साफ नाकारले. येथपर्यंत ठीक; पण यानंतर शाहूमहाराजांनी प्रत्येकाला आखून दिलेल्या प्रदेशात काही पराक्रम करण्याऐवजी ते एकेक निजामाला जाऊन मिळाले ! कोल्हापूरचा संभाजीसुद्धा निजामाला मिळून शाहूला उखडण्याचा डाव रचू लागला. त्या वेळी कोणी शंकराचार्यांनी, कोणी महाराजांनी, स्वामींनी, वारकरीपंथाच्या व दत्त, आनंद, चैतन्य या संप्रदायांच्या धुरीणांनी हा अधर्म आहे असे त्यांना सांगितले काय ? यवनसेवा, तुर्कसेवा हा अधर्म आहे