पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१६३
 


कारणांचे मूलकारण :
 वर दिलेली कारणे सर्वमान्य अशीच आहेत. शिवाय वरील सर्व इतिहास-पंडित मराठ्यांचे अभिमानी आहेत. पंजाब विद्यापीठातील लेखकही अनेक ठिकाणी मराठ्यांचा मुक्तकंठाने गौरव करताना दिसतात. तेव्हा त्यांनी काही पूर्वग्रह ठेवून ही कारणे दिली आहेत असे म्हणता येणार नाही. त्यांच्या ग्रंथांचा व एकंदर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना मला याहून काही निराळी कारणे सापडली आहेत असे नाही. पण मी येथे एका निराळ्या दृष्टीने विचार करणार आहे. वर या पंडितांनी दिलेले दुर्गुण मराठ्यांच्या ठायी का उद्भवावे ? दीडशे वर्षांच्या वाढत्या वैभवाच्या काळातही ते लोप न पावता जास्तच प्रबळ का व्हावे ? याचा विचार केला पाहिजे असे वाटते. हिंदुसमाजात त्या काळी चॅथॅमसारखे कर्ते पुरुष निर्माण होणे शक्य नव्हते, हिंदुस्थानचे पारतंत्र्य अटळ होते, मराठ्यांचे राज्य म्हणजे मातीचे भांडे होते, ते फुटणे अपरिहार्य होते, अशी विधाने काही पंडितांनी केली आहेत. तेव्हा हा समाज कुठल्या तरी जुनाट रोगाने ग्रस्त झालेला असला पाहिजे, वरवरच्या औषधोपचारांनी तो रोग समूळ नष्ट होणे शक्य नव्हते, असे स्वच्छ दिसते. याची काही कारणमीमांसा केली पाहिजे. राष्ट्रनिष्ठा नाही, संघटनतत्व नाही. शिस्त नाही, ज्ञानार्जनाची हौस नाही, विज्ञानाचा अभ्यास नाही, जग पाहाण्याची जिज्ञासा नाही, चिकाटी नाही, निश्चय नाही यांमुळे मराठे पराभूत झाले हे खरे. पण हे सद्गुण त्यांच्या ठायी का निर्माण झाले नाहीत, आणि या समाजाला जय मिळणे शक्यच नव्हते, असे इतिहासत्त्ववेत्ते का म्हणतात, हे अधिक खोल जाऊन पाहिले पाहिजे. कारणांचेही मूलकारण शोधले पाहिजे.

अधर्मशास्त्र :
 माझ्या मते अकराव्या बाराव्या शतकापासून त्या वेळेच्या धर्मशास्त्रकारांनी जे हिंदुधर्मशास्त्र- किंवा खरे म्हणजे अधर्मशास्त्र- या समाजात रूढ केले ते या सर्व अनार्थाच्या बुडाशी आहे. भिन्नभिन्न आचार्यांनी उपदेशिलेली ती निवृत्ती, तो पुराणप्रणीत (गीताप्रणीत नव्हे) निष्क्रिय भागवतधर्म, चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता ही ती सनातन विघटक तत्त्वे, ते शब्दप्रामाण्य, तो कर्मवाद, ती शुद्धिबंदी, तो समुद्रगमननिषेध, ती कलियुगकल्पना, ते कर्मकांड, ती