पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

सुभ्याची आवड, राष्ट्राभिमानाचा अभाव, आपसातील फूट, मध्यवर्ती सत्तेचा कमकुवतपणा आणि कवाइती लष्कर व सुधारलेली युद्धसामग्री यांचा अभाव ही केळकरांच्या मते मराठेशाही बुडण्याची खरी कारणे होत. मराठयांच्या साम्राज्यात घटनात्मक राज्यव्यवस्था नव्हती, लष्करात व्यवस्था व शिस्त नव्हती, भौतिक ज्ञानाची, विज्ञानाची, त्यांनी उपेक्षा केली, त्यांनी जगप्रवास कधी केला नाही ही कारणे सरदेसाई देतात. आणखी एक महत्त्वाचे कारण त्यांनी दिले आहे. सर्वांस धाकात ठेवून सर्वांकडून योग्य कामगिरी घेणारा चालक राष्ट्राला मिळाला नाही हे, त्यांच्या मते, राज्यनाशाचे आद्य कारण होय. इंग्रजांचे जबरदस्त राजकारण हेही एक कारण ते सांगतात. खरेशास्त्री यांच्या मते देशाभिमानशून्यता, समूहरूपाने कार्य करण्याची नालायकी, स्वार्थसाधनाची बेसुमार हाव, आळस, हेळसांड, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय हे दुर्गुण आमच्या राज्यनाशाला कारण झाले आहेत. कडवा धर्माभिमान, करडी राजनीती, करारीपणा, चिकाटी, निश्चय या गुणांचा अभाव ही कारणे शेजवलकर देतात. 'मराठाज् अँड पानिपत' या नावाचा एक ग्रंथ पंजाब विद्यापीठाने १९६१ साली प्रसिद्ध केला आहे. त्या विद्यापीठातील इतिहासशाखेचे प्रमुख प्रा. हरिराम गुप्ता हे त्याचे संपादक आहेत. 'अठराव्या शतकातील हिंदु- समाजात जातिभेद अत्यंत तीव्र होता. या समाजास ऐक्य, संघटना यांचा कसलाही पाया नव्हता. बंधुभावाला कसलाही आधार नव्हता. भिन्न भिन्न हिंदुसत्ता सांघिक वृत्तीने कार्य करू शकत नसत, त्यामुळे मुत्सद्देगिरी व रणांगण यांत त्यांचा पराभव झाला. हिंदुसमाजाचे ऐक्य हा एक भ्रम होता. उलट मुस्लीम समाजात धर्म हे प्रबळ संघटनतत्त्व होते. जिहाद- धर्मयुद्ध- या घोषणेने मुस्लीम समाज चटकन् एकत्र येई.' पानपतावरील मराठ्यांच्या अपयशाची कारणे देताना त्यांनी हे मत मांडले आहे. (प्रस्तावना, पृ. १२) दुसरे एक प्राध्यापक श्री. सनगर यांनी, वतनदारी, सरंजामदारी, शिवाजीच्या वेळच्या उच्च ध्येयनिष्ठेचा अभाव व मुत्सद्देगिरीचा अभाव, ही कारणे दिली आहेत. (पृ. २५६). नित्याची दुही, व्यवस्थितपणाचा अभाव, जुटीने काम करण्याच्या वृत्तीचा अभाव,– अशी कारणे न्या. मू. रानडे यांनी 'मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष' या आपल्या ग्रंथात दिली आहेत.