पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१६१
 

हे मान्य आहे; पण तो किंवा त्याचा पुत्र नानासाहेब पेशवा हे दीर्घायुषी झाले असते तरी भारताचे पारतंत्र्य- इंग्रजांचे अधिराज्य- टळले असते असे नाही. फारफार ते लांबणीवर पडले असते.' यदुनाथ सरकार यांच्या या म्हणण्याचा अर्थ काय ? (पेशवा बाजीराव- सरदेसाई, प्रस्तावना- यदुनाथ सरकार, पृ. १२) प्रा. शेजवलकर यांनी नानासाहेब पेशवे व इंग्लंडचा त्याचा समकालीन नेता चॅथॅम याची तुलना करून नानासाहेबाला अगदी हिणकस ठरविले आहे आणि हे विवेचन करताना म्हटले आहे की, 'नानासाहेबाच्या जागी आमच्यात त्या काळी चॅथम का निर्माण झाला नाही, याचे उत्तर, आमच्या मते, हिंदी समाज हा इंग्रजी समाजाप्रमाणे नव्हता हे आहे.' (नानासाहेब पेशवे- चरित्र, सरदेसाई, प्रस्तावना- शेजवलकर, पृ. ७) याचा अर्थ असा की हिंदी समाजात चॅथॅम निर्माण करण्याची ऐपतच नव्हती! याचे कारण काय ? याच प्रस्तावनेत जपानशी भारताची तुलना करून शेजवलकर म्हणतात, 'ज्या काळी पाश्चात्यांनी आमच्या किनाऱ्यावर प्रवेश केला त्याच सुमारास जपानच्या किनाऱ्यावरही केला, पण ते श्वेतेतर (आशियाई) राष्ट्र पाश्चात्य गिधाडांच्या तडाख्यातून सुटून पुन्हा त्यांच्याच जोडीस बसले. कोणत्याही पाश्चात्य राष्ट्राने इतक्या अल्प अवधीत एवढी कर्तबगारी दाखविलेली नाही. या जपानी मुत्सद्दयांच्या पासंगालाही पुरणारी हुषारी दाखविणारा पेशवाईत कोणी निघाला नाही ही केवढ्या शरमेची गोष्ट आहे?' 'मराठे व इंग्रज' या तात्यासाहेब केळकरांच्या ग्रंथाला वासुदेवशास्त्री खरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा समारोप करताना त्यांनी म्हटले आहे की, 'हिंदुस्थान इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता त्यांतले कोणते फुटावयाचे, मातीचे की लोखंडाचे, हे ठरलेलेच आहे!' हिंदुस्थानचे पारतंत्र्य हे अटळ होते असा यदुनाथ सरकारांच्या म्हणण्याप्रमाणेच खरेशास्त्री यांच्याही म्हणण्याचा भावार्थ आहे. या इतिहास पंडितांनी असा निष्कर्ष का काढावा ?

आतापर्यंतची मीमांसा :
 वर मराठ्यांच्या सत्तेसंबंधी, साम्राज्यासंबंधी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांची उत्तरे आजवर अनेकांनी दिलेली आहेत. वर ज्या थोर इतिहासवेत्त्यांचा उल्लेख केला आहे त्यांनी आपल्या लेखांत त्यांचे विवेचनही केले आहे. सवत्या