पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

अनेक प्रांतांतून चौथाई, सरदेशमुखी या हक्कांसाठी आणि इतर अनेक प्रकारे अमाप धन मिळवून स्वदेशी परत येत. असे असताना ते कायमचे कर्जबाजारी का राहिले ? बाजीराव, नानासाहेब, माधवराव यांना कर्जाची अहोरात्र चिंता असे. त्यापायी त्यांचे निम्मे रक्त आटले असेल. इंग्रज हे परमुलखातून आलेले. त्यांनाही सर्व हिंदुस्थानभर फौजा न्यावा लागत; पण ते असे कर्जबाजारी कधीच झाले नाहीत! पुढचा प्रश्न असा की निजाम, हदर, अलीवर्दीखान, अर्काटचे नवाब, महंमदखान बंगष, यांना मराठ्यांनी अनेक वेळा जवळ जवळ प्रत्येक लढाईत पराभूत केले होते. तरी त्या मुस्लीम सरदारांनी मूळच्या सत्ताधाऱ्यांना नष्ट करून तेथे आपली राज्ये स्थापिली तसे मराठ्यांनी का केले नाही ? पन्नास वर्षे त्यांच्या कायमच्या कटकटी मागे ठेवून देण्यात त्यांनी काय साधले ? पानपतावर मराठयांचा अहंमदशहा अब्दालीशी संग्राम झाला. हिंदुपदपातशाहीची स्थापना हे मराठ्यांचे ब्रीद होते. त्यांचे ते घोषवाक्यच होते. असे असून रजपूत, जाट, शीख यांपैकी कोणीही हिंदुराजे, सत्ताधारी वा सरदार पानपताला त्यांच्या बाजूने लढण्यास का उभे राहिले नाहीत ? त्या सर्वांना मुस्लीम सत्तेचा जुलूम अगदी असह्य झाला होता. त्यातून मुक्त व्हावे अशी त्यांची उत्कट इच्छा होती. माळव्याच्या स्वारीच्या वेळी रजपुतांनी मराठ्यांना सर्वतोपरी साह्य केले होते ! तरी पानपतावर मात्र त्यांनी व जाट- शिखांनी मराठ्यांना काडीमात्र साह्य केले नाही. उलट त्या वेळी ते मराठ्यांना शत्रूच लेखीत असत. त्यांची अशी विपरीत वृत्ती का झाली ? आणखी एक प्रश्न मनात उद्भवतो तो असा- बाबराच्या वेळेपासून मुसलमान आक्रमक लढाईत तोफांचा वापर करीत होते. तरी १७५० पर्यंत म्हणजे दोनशे-सव्वा दोनशे वर्षे होऊन गेली तरी मराठ्यांनी आपला तोफखाना का तयार केला नाही ? बाजीरावाने आपल्या अद्वितीय रणकौशल्याने पालखेड व भोपाळ येथे निजामाचा तोफखाना पोचणार नाही अशा ठिकाणी त्याला गाठून पराभूत केले हे निराळे. पण तोफा असत्या तर द्राविडी प्राणायाम करण्यात शक्ती खर्च झाली नसती; आणि मराठ्यांचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले असते. असे असूनही मराठे गहाळ का राहिले ? बाजीरावासंबंधाने लिहिताना यदुनाथ सरकार यांनी प्रथम त्याचा अतिशय गौरव केला आहे आणि शेवटी एक प्रश्न उपस्थित करून त्याच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन केले आहे. ते म्हणतात, 'बाजीराव अत्यायुषी झाला म्हणून मराठा राज्याचा तोटा झाला