पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१५९
 

माधवराव मृत्यू पावल्यामुळे नाना फडणिसाच्या मागची पुण्याई संपून तो निष्प्रभ झाला सर्व मराठा मंडळाची शक्ती संघटित करील असा प्रतापी पुरुष आता कोणीच राहिला नाही व नवा निर्माण झाला नाही. यामुळे हिंदुपदपातशाहीचे स्वप्न साकार होत येते न येते तोच ते भग्न झाले आणि इंग्रजांनी अखिल हिंदुस्थान आक्रमून तेथे आपले अधिराज्य स्थापन केले.

मूल्यमापन :
 मराठ्यांनी भारतातून मुस्लीम सत्तेचा समूळ नाश करून आपले वर्चस्व कसे प्रस्थापित केले त्याचे वर्णन व विवेचन येथवर केले. आता त्यांच्या या कार्याचे हिंदुसमाजाच्या संघटनेच्या व विघटनेच्या दृष्टीने मूल्यमापन करावयाचे आहे. हा मूल्यमापनाचा विचार मनात येताच अनेक प्रश्न समोर उभे राहतात. 'मराठ्यांचे साम्राज्य' असा शब्दप्रयोग नेहमी केला जातो त्याचा नेमका अर्थ काय? मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर माळवा, गुजराथ, ग्वाल्हेर व नागपूर या प्रांतांतच फक्त राज्य स्थापिले होते. संरक्षण, न्यायदान, करवसुली, चोरा- चिलटांचा बंदोबस्त ही शासनाची कर्तव्ये ते या प्रांतांपुरतीच पाहात असत. भारतातल्या इतर प्रांतांत ते फक्त चौथाईच्या वसुलीसाठी जात आणि ती लढाईवाचून कधीच वसूल होत नसल्यामुळे त्या वेळी अमाप लूटमार सहजच होई; पण याचा परिणाम फार वाईट होत असे. हे केवळ लुटारू आहेत असा तेथील लोकांचा समज होत असे आणि आजही बऱ्याच अंशी तो कायम आहे. वास्तविक प्रारंभी माळवा, गुजराथ मराठ्यांनी घेतले तेव्हा त्यांचे धोरण असे नव्हते. ते प्रांत चौथाईसाठीच त्यांनी घेतले; पण लगेच तेथे त्यांनी राज्य स्थापून रयत सुखी केली. मग बंगाल, बिहार, ओरिसा, पंजाब, मुलतान, कर्नाटक या प्रदेशांत त्यांनी हेच धोरण का अवलंबिले नाही ? आपल्या नावाला लुटारू, दरोडेखोर अमा कलंक का लावून घेतला ? आणि असा कलंक लागलेला असताना 'मराठा साम्राज्य' हा शब्दप्रयोग कितपत सार्थ आहे ? दुसरा प्रश्न असा की, अगोदर दक्षिणेत दृढ अशी राज्यस्थापना न करता ते उत्तरेत कशासाठी गेले ? अटकेपार त्यांनी झेंडा नेला खरे. पण तो किती दिवस टिकला ? एक भरारी यापलीकडे त्याला काय विशेष अर्थ आहे ? मराठे दरसाल दसऱ्यानंतर मुलुखगिरीसाठी बाहेर पडत. आणि