पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

आणून बसविले. अशा रीतीने पानपतच्या पराभवाची त्यांनी भरपाई केली. 'हिंदुपदपातशाही' या ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले आहे की, '१७७० नंतर मुस्लीमसत्ता भारतात निष्प्रभ झाली. हिंदुपदपातशाहीच्या मार्गातील एक विरोधी प्रभावी शक्ती म्हणून तिचा विचार करण्याचे आता कारण राहिले नाही!' सावरकरांचे हे म्हणणे सर्वथैव खरे आहे. अवनिमंडल निर्यवन करण्याचे मराठ्यांनी आरंभिलेले कार्य येथे पुरे झाले.

स्वप्न भंगले :
 पण हिंदुपदपातशाहीच्या मार्गातील एक विरोधी सत्ता ज्या शतकात मराठ्यांनी नष्ट केली त्याच शतकात तिच्याहून किती तरी पटींनी जास्त समर्थ अशी दुसरी सत्ता भारतात निर्माण होत होती आणि आता तिचा प्रभाव भारतात सर्वत्र जाणवू लागला होता. मराठ्यांनी पातशहा व दिल्ली यांना पुन्हा ताब्यात घेतले तेव्हा इंग्रजांनी सर्व बंगाल आक्रमिला होता व दिल्ली आक्रमिण्याच्या उद्योगास त्यांनी प्रारंभही केला होता; पण या वेळी महादजी शिंदे हा एक थोर, कर्ता व महापराक्रमी पुरुष मराठमंडळात उद्यास आला व त्याने पुढील पंचवीस वर्षे इंग्रजांच्या त्या उद्योगाला पायबंद घातला. त्याच्या मृत्यूपर्यंत इंग्रजांना दिल्लीकडे दृष्टी टाकण्याची छाती झाली नाही. या काळात राघोबा मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला गेल्याकारणाने, पुण्यावरच चालून जाऊन तेथे पेशव्यांच्या गादीवर त्याला स्थापून, मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणण्याचा डाव इंग्रजांनी टाकला होता; पण तळेगावच्या लढाईत त्यांचा पराभव होऊन त्यांना मराठ्यांशी अत्यंत नामुष्कीचा तह करावा लागला. त्यानंतर दक्षिणेत नाना फडणीस व उत्तरेत महादजी यांच्या प्रभावामुळे इंग्रजांना काही हालचाल करता आली नाही. १७९२ साली महादजीने दिल्लीच्या बादशहाकडून वकील इ-मुतलीकच्या सनदा आणून पेशव्यास अर्पण केल्या. या सनदांमुळे पेशवे पातशहाचे वजीर झाले व महादजी शिंदे बक्षी म्हणजे सेनापती झाले व अशा रीतीने पातशाही संपूर्णपणे हिंदूंच्या ताब्यात आली. यानंतर कालांतराने दिल्लीस हिंदुपदपातशाहीचीही स्थापना झाली असती; पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे मराठ्यांचा टिकाव लागला नाही. कदाचित आणखी काही वर्षे मराठेशाही टिकली असती; पण या सुमारास महादजी, हरिपंत फडके, रामशास्त्री असे कर्ते पुरुष काळाधीन झाले. सवाई