पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१५७
 

रोहिल्यांच्याही आकांक्षा होत्या. त्यांचा तर अफगाणिस्तानशी घनिष्ठ संबंध होता. ती त्यांची मायभूमीच होती. निजाम व रोहिले या दोघांनाही दिल्लीच्या बादशहाबद्दल कसलेच प्रेम नव्हते. ते प्रचळ असते तर त्यांना हवेच होते; पण ते दुबळे असून हळूहळू मराठ्यांच्या आहारी जात आहेत व यामुळे कालांतराने दिल्लीला हिंदुसत्ता प्रस्थापित होईल, याचे त्यांना पराकाष्ठेचे वैषम्य वाटत होते. १७४५ पासून दिल्लीला शह देण्याचा मराठ्यांचा उद्योग स्पष्ट दिसू लागला होता आणि १७५० साली बादशहाने त्यांना चौथाईचे हक्क दिले तेव्हा रोहिल्यांना कसलीच शंका राहिली नाही. म्हणून त्यांनी अफगाणिस्तानचा सुलतान अहंमदशहा अब्दाली- दुराणी- याशी संधान बांधून त्याला पाचारण केले व अशा रीतीने दिल्लीला पठाणी सत्ता स्थापून हिंदुपदपातशाही निर्माण होण्याचा संभवच नष्ट करून टाकण्याचा डाव त्यांनी टाकला. मराठे व अबदाली यांचा संघर्ष सुरू झाला तो या कारणाने. बादशहाच्या वतीने सर्व उत्तर हिंदुस्थानचे रक्षण मराठ्यांना करावयाचे होते. बादशहाला व त्याच्या सरदारांना अवदाली व रोहिले सारखेच शत्रू वाटत असत. त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणूनच त्यांनी मराठ्यांचा आश्रय केला होता. आणि यातून होणारा अनर्थ दिसत असल्यामुळे रोहिल्यांचा त्याला कडवा विरोध होता. म्हणजे हा धर्मसंग्रामच होता.

अटकेपार :
 अबदालीने १७४८ सालीच हिंदुस्थानवर स्वारी केली होती. पुढील दहा-बारा वर्षांत त्याने आणखी तीन स्वाऱ्या केल्या. त्याच्या प्रतिकारार्थ मराठे सज्ज होते. अशा एका स्वारीतच रघुनाथरावाने अटकेपार मराठ्यांचा झेंडा रोवला व मराठ्यांच्या आकांशांना गगन ठेंगणे आहे, हे दाखवून दिले. शिंदे-होळकरांचा तर अबदाली व त्याचे सरदार यांशी सतत संघर्ष चालू होता. यातूनच पानपतचा संग्राम उद्भवून मराठ्यांचा त्यात पराभव झाला. या पराभवाने मराठ्यांच्या हिंदुपदपातशाहीच्या आकांक्षांना जबरदस्त धक्का बसला. त्यांचे ते स्वप्न जवळ- जवळ भंगूनच गेले; पण माधवराव सारखा कर्ता पुरुष पेशवाईवर आल्याने मराठ्यांनी ते स्वप्न पूर्णपणे भंगू दिले नाही. पुढील आठदहा वर्षांत पुन्हा उत्तरेत त्यांनी पाय रोवले व १७७० साली रोहिलखंडात शिरून तेथे रोहिल्यांचा संपूर्ण निःपात केला आणि बादशहाला ताब्यात घेऊन दिल्लीच्या तख्तावर