पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

स्थूल एकरूपता आणली. पण ९०० वर्षांचा इतिहास पाहता विद्येविषयी होत असलेल्या दुर्लक्षामुळे, स्पर्धा करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीचा नाश करू पाहणाऱ्या इतर संस्कृतींशी भारतातील विद्वानवर्ग अपरिचित असल्यामुळे, वाढत चाललेल्या ज्ञानक्षेत्राशी असंबद्ध राहिल्याने, जगाशी स्पर्धा करण्यास योग्य असे समाजयंत्र बनविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि इतर काही कारणांनी या संस्कृतीचा दिवसेंदिवस नाश होत आहे. एकेकाळी या संस्कृतीचा पगडा बॅक्ट्रियापासून कांबोडियापर्यंत आणि खरोष्ट्रापासून फिलिपाईनपर्यंत इतका दृढ झाला होता की, हा सर्व प्रदेश म्हणजे भारतवर्षच होऊ पहात होता...... तीच संस्कृती आज नामशेष होऊ पहात आहे. आणि आपण जागरूक झाल्यास तिचे भवितव्य काय आहे या सर्व गोष्टी आपणास विचारार्ह आहेत.' (ज्ञानकोश, प्रस्तावनाखंड, विभाग १ ला, पृ. ४४)
 डॉ. केतकरांच्याप्रमाणेच हिंदुसंस्कृतीविषयीची ही चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. आणि साधारणतः गेली ९०० वर्षे या समाजाला दौर्बल्य आले आहे, प्रतिकारक्षम असे समाजयंत्र बनविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या दीर्घ काळात या समाजाला आत्मरक्षण करण्यात, आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यात अपयश आले आहे याविषयीही बहुतेक पंडितांचे एकमत आहे.- (चिं. वि. वैद्य-मध्ययुगीन भारत, खंड ३ रा, प्रस्तावना. द. के. केळकर- संस्कृतिसंगम, पृ. ३०४)
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या १८ वर्षांचा इतिहास पाहता हिंदुसमाजाचे दौर्बल्य अगदीच उघडे होऊन वरील चिंता मनाचा जास्तच दाह करीत आहे. चीनने गिळलेला भाग आपण परत घेऊ शकलो नाही. पाकिस्तानसारखे अत्यंत क्षुद्र राष्ट्रही दिवसातून दहा वेळा आपल्या सरहद्दींचा भंग निर्भयपणे करते, आपल्या भूप्रदेशावर आक्रमण करून त्याचे लचके तोडते; आणि भारताचे नेते त्याच्या प्रतिकाराची तीव्र भाषासुद्धा बोलू धजत नाहीत. नागाप्रश्न, काश्मीरप्रश्न, आसाम, सीमाप्रश्न यांनी भारताच्या संरक्षणसामर्थ्याची सत्त्वपरीक्षाच चालविली आहे. आसामात आठ लक्ष पाकिस्तानी घुसले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचेही सामर्थ्य भारताजवळ नाही. डॉ. केतकरांनी म्हटल्याप्रमाणे एकेकाळी बॅक्ट्रिया ते कांबोडिया व खरोष्ट्र ते फिलिपाइन इतका भूखंड भारतवर्ष होऊ पाहात होता. उलट आता, गेली कित्येक शतके जो भूखंड भारतवर्षं म्हणून मान्य होता,