पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

तो प्रांत बळकावला. त्यामुळे त्याला रोहिलखंड असे नाव पडले. रोहिले हे सुनीपंथी असून वजीर सफदरजंग हा शिया होता. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला; पण हे निमित्त कारण होय. दिल्लीची पातशाही अगदी दुबळी झालेली रोहिल्यांना दिसत होती. तेव्हा पूर्वी लोदी व सूर या अफगाण वंशांनी जसे दिल्लीस राज्य स्थापिले होते, तसे पुन्हा स्थापण्याची स्वप्ने त्यांना पडू लागली, म्हणून त्यांनी दुआबात व अयोध्याप्रांतात बंडाळ्या माजविण्यास प्रारंभ केला. बादशाही सरदारांना व वजीराला त्यांना पायबंद घालणे शक्य होईना. म्हणून त्यांनी मराठ्यांची मदत घेण्याचे ठरविले. जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर या वेळी उत्तरेत होतेच. त्यांनी १७५० साली चौथाईचा करार करून दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी घेऊन पेशव्यांतर्फे तसा करार करून दिला. या कराराअन्वये ठठ्ठा, मुलतान (सिंध), पंजाब, रजपुताना व रोहिलखंड एवढ्या प्रदेशांत चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला आणि याच्या बदल्यात सिंधपासून काशीपर्यंत सर्व प्रदेशाचा बंदोबस्त मराठ्यांनी करावयाचा होता. यानंतर थोड्याच दिवसांनी बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांचे चौथाईचे हक्क मराठ्यांना कसे मिळाले ते वर सांगितलेच आहे. अशा रीतीने श्रीशिवछत्रपतींनी सुरू केलेल्या चौथाईच्या पद्धतीने मराठ्यांनी एका शतकाच्या आत सर्व हिंदुस्थान व्यापला व हिंदुपदपातशाहीच्या स्थापनेची सिद्धता केली.

धर्मसंग्राम :
 या वेळी दिल्लीची पातशाही जरी दुबळी झाली असली तरी तिचे निरनिराळ्या प्रांतांचे सुभेदार हे बरेच प्रबळ होते. दक्षिणेत निजाम व बंगालमध्ये अलीवर्दीखान यांनी मराठ्यांची सत्ता कधीच जुमानली नाही. मराठे त्यांना नमवीत तेवढ्यापुरते ते नमत; पण पुन्हा झगडा चालू करीत. अखिल हिंदुस्थानवर मुस्लीमांचे राज्य पुन्हा स्थापावे अशा त्यांच्या आकांक्षा होत्या. मराठ्यांना नमविण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही हे ध्यानात येताच त्यांनी वायव्येकडून पठाणी सुलतानांना बोलविण्याची पूर्वपरंपरा पुन्हा चालू केली. निजामाने नादिरशहाला याच कारणासाठी पाचारण केले होते; निदान तो यावा अशी त्याची प्रबळ इच्छा होती व म्हणूनच दिल्लीचा या वेळी तो वजीर असतानाही त्याने नादिरशहाला तोंड देण्याची कसलीच व्यवस्था केली नाही. निजामाप्रमाणेच