पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१५५
 

 दिल्लीच्या स्वारीनंतर पुढील दहा-पंधरा वर्षांत, चौथाईच्या पद्धतीने अखिल भारतावर वर्चस्व प्रस्थपित करण्याचा मराठ्यांचा उद्योग पूर्ण झाला. मराठ्यांच्या शक्तीला या वेळी सर्व बाजूंनी उधान येत होते व मोठमोठे कर्ते, पराक्रमी पुरुष महाराष्ट्रात निर्माण होऊन ते हिंदुस्थान आटोपीत होते. नागरपूरचा रघूजी भोसले हा अशा पराक्रमी पुरुषांपैकीच एक होता. १७४० साली अर्काटच्या नबाबाचा जावई चंदासाहेब हा, तंजावरच्या गादीवर असलेला शहाजीचा वंशज प्रतापसिंह भोसले याला उखडून टाकण्याच्या विचारात होता. त्या वेळी छत्रपती शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून रघूजी मोठी सेना वेऊन कर्नाटकात उतरला व त्याने घनघोर युद्ध करून नबाबाला ठार मारले, चंदासाहेबाला कैद केले व एक कोट रुपये खंडणी घेऊन नवाबाचा मुलगा सफदरअली यास अर्काटचा नबाब केले. याच वेळी मुरारराव घोरपडे यास त्रिचनापल्लीस ठेवून तेथे त्यानं मराठ्यांचे कायमचे ठाणे बसविले. कर्नाटकातून परत गेल्यावर बंगाल, बिहार व ओरिसा या पूर्व हिंदुस्थानातील प्रदेशांवर रघूजीने स्वाऱ्या करण्यास प्रारंभ केला. अलीवर्दीखान या पराक्रमी सरदाराने पातशाही सुभेदार सर्फराजखान यास मारून तो सर्व मुलूख बळकावला होता. १७५२ सालापर्यंत बंगालवर चार स्वाऱ्या करून भोसल्यांनी अलीवर्दीस वठणीवर आणले तेव्हा त्याने तीनही प्रांतांवरचा मराठ्यांचा चौथाईचा हक्क मान्य करून तसा तहनामा करून दिला. कर्नाटकाप्रमाणेच ओरिसातील कटक शहरी रघूजीने शिवरामभट साठे याला नेमून तेथेही मराठ्यांचे ठाणे कायम केले.

उत्तर हिंद :
 पूर्वेप्रमाणेच उत्तरेचे-दिल्लीचे- राजकारणही साधारण याच सुमारास शिजून तयार झाले. या वेळी मुसलमानांतच दोन पक्ष पडून बादशहाला मराठ्यांच्या संरक्षणाची गरज भासू लागली. बादशहा अहंमदशहा याने मनसूरअली सफदरजंग यास वजीर व गाजीउद्दीन यास बक्षी- सेनापती- नेमिले. याच वेळी रोहिल्यांचा उदय होत होता हे मूळचे अफगाण. नादिरशहाच्या स्वारीपासून यांच्या झुंडीच्या झुंडी भारतात येऊन राहू लागल्या. हळूहळू गंगा-यमुनांच्या दुआबाच्या उत्तरेकडच्या कटेरा प्रांतात त्यांची वसाहत होऊ लागली. रोहिले हे भयंकर आडदांड, तामसी व क्रूर होते. त्यांनी मूळच्या हिंदूंना कटेरातून हुसकून लावून