पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

अंमल यमुनातीरापर्यंत झाला. नानासाहेब सरदेसाई म्हणतात, 'हे एकंदर प्रकरण म्हणजे मराठे व रजपूत यांचे मोगल बादशाहीविरुद्ध धर्मयुद्धच होय. ते जिंकल्यामुळे 'हिंदूंचा पुरस्कर्ता' अशी बाजीरावाची कीर्ती झाली.' (मराठी रिसायत, ५।२, पेशवा बाजीराव, पृ. १४२) या मोहिमांपासूनच इन्दूर, धार, ग्वाल्हेर, सागर येथे मराठ्यांची कायमची ठाणी बसू लागली व तेथून त्यांचे उत्तरेतले उद्योग सुलभ होऊ लागले. याच वेळी शाहूच्या आज्ञेने कर्नाटक व गुजराथ या प्रदेशांत मराठ्यांनी मोहिमा सुरू करून तेथूनही ते चौथाई वसूल करू लागले. गुजराथेत तर त्यांनी माळव्याप्रमाणे राज्यच प्रस्थापित केले.

कालचक्र उलटविले :
 माळवा, गुजराथ व बुंदेलखंड पडल्यामुळे दिल्लीची पातशाही हादरून गेली व तेथल्या दरबारातच, मराठ्यांच्या आश्रयावाचून पातशाही तरणे यापुढे शक्य नाही, असे म्हणणारा एक पक्ष निर्माण झाला. दिल्लीच्या पातशाहीची अशी विकल स्थिती असतानाच श्रीमंत प्रौढ प्रताप राऊस्वामी तथा थोरले बाजीरावसाहेब यांनी २८ मार्च १७३७ रोजी दिल्लीवर स्वारी केली. ही स्वारी करून बाजीरावाने कालचक्रच फिरवून टाकले. १२९६ साली अल्लाउद्दिनाने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हापासून पाचशे-साडेपाचशे वर्षे तुर्कांची, मोगलांची दक्षिणेवर स्वारी, असाच काळाचा लोट चालू होता. बाजीरावाने दोन्ही बाहूंनी त्याला कव घालून तो उलटून टाकला आणि मराठ्यांच्या दिल्लीवर, लाहोरवर, अटकेपार स्वाऱ्या सुरू झाल्या.
 दिल्लीच्या स्वारीने पातशाही तर हादरलीच; पण सर्व हिंदुस्थानही हादरले. मराठे ही एक नवी महाशक्ती निर्माण झाली हे अखिल भारतातील सत्ताधीशांनी व जनतेने जाणले. राजस्थानातील अनेक रजपूत सरदार पातशहाचा आश्रय सोडून उघड उघड मराठ्यांच्या आश्रयाला आले. यातच चिमाजीअप्पा याने कोकणात पोर्तुगीजांवर स्वारी करून वसई वेऊन भोवतालचा मोठा प्रदेश पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त केला. यामुळे, मराठे हे केवळ तुर्कांनाच भारी आहेत असे नसून पाश्चात्य सत्तांनाही निर्दाळू शकतात, असा त्यांचा लौकिक सर्वत्र झाला व बाजीरावाच्या रूपाने आपल्याला एक नवा समर्थ नेता लाभला असा हिंदूंना दिलासा मिळाला.