पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१५३
 

हतबल कशी करून टाकिली ते पाहावयाचे आहे.

स्वराज्याचे साम्राज्य :
 १७२८ साली पालखेड येथे निजामाचा पूर्ण पराभव केल्यावर बाजीराव व चिमाजी यांच्या मनात मोठ्या आकांक्षा निर्माण झाल्या व हिंदुपदपातशाहीचे शिवछत्रपतींचे स्वप्न साकार करण्याचा उद्योग आता हाती घ्यावा असे त्यांनी ठरविले. मनाचा असा निश्चय होताच त्यांची नजर माळव्यावर गेली. माळवा हे दिल्लीच्या पातशाहीचे मर्मस्थान होते. ज्याच्या हातात माळवा तो उत्तर हिंदुस्थानचा स्वामी, हे ठरलेले होते. शिवाय औरंगजेबाशी युद्ध सुरू असतानाच त्याला शह देण्यासाठी, मराठ्यांनी माळव्यावर हल्ले सुरू केले होते. त्यानंतर आता बादशाही अमलात माळव्याच्या रयतेवर व तेथील रजपूत सरदारांवर अतिशय जुलूम होऊ लागला होता. रयत अगदी गांजून गेली होती व सरदार हैराण होऊन गेले होते. याच वेळी पेशव्यांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांनी ऐकली व स्वसंरक्षणासाठी त्यांना बोलावून सवाई जयसिंग, नंदलाल मंडलोई, वढवाणीचा ठाकूर अनूपसिंह व मांडवगडचे ठाकूर यांनी त्यांना सर्व प्रकारे साह्य करण्याचे आश्वासन दिले. या राजपुतांच्या साह्याच्या आधारावरच बाजीरावाने चिमाजीअप्पाची रवानगी माळव्यावर केली व त्यानेही अपूर्व पराक्रम करून गिरिधर व दयाबहादुर या बादशाही सरदारांस बुडवून माळवा जिंकला. शिंदे, होळकर, पवार या नवोदित मराठा सरदारांनी या वेळी पराक्रमाची शर्थ केली. म्हणूनच माळवा सर करून तेथे मराठ्यांना आपले राज्य प्रस्थापित करता आले. मराठ्यांनी माळव्यात उत्तम व्यवस्था लावून रयत इतकी सुखी केली की पाश्चात्य पौर्वात्य, सर्व इतिहासकार त्यांची यासाठी मुक्तकंठाने आजही प्रशंसा करतात. (माळवा इन ट्रॅझिशन- महाराज कुमारसिंग; सेंट्रल इंडिया- मालकम, खंड २ रा, पृ. ८२) माळव्यानंतर बाजीराव स्वतः बुंदेल खंडावर चालून गेला. या वेळीही बुंदेले रजपूत व त्यांचा राजा छत्रसाल यांनीच मराठ्यांना साह्यार्थ बोलाविले होते. महंमदखान बगष याने जैतपूरच्या लढाईत त्यांचा पराभव करून जैतपूरच्या किल्ल्यात छत्रसाल व त्याचे पुत्र यांना कैदेत ठेवले होते. बाजीरावाने जैतपूरला वेढा देऊन बंगषाची अन्नान्नदशा केली. तेव्हा बंगष शरण आला. माळव्याप्रमाणेच हाही विजय अपूव झाला व मराठ्यांचा