पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

नवीन क्षेत्र प्राप्त झाले. चौथाई- सरदेशमुखीचे हक्क मिळाल्यामुळे बाहेर संचार करण्याची मोकळीक मराठ्यांना मिळाली. स्वहित संभाळण्यासाठी आजूबाजूच्या सत्ताधीशांसंबंधाने चढावाची राज्यपद्धती स्वीकारावी लागते तसा बहुतेक प्रकार मराठ्यांचा झाला. या सनदांमुळे मराठ्यांच्या कारभारास नवीन वळण लागले. नवा मनू सुरू झाला. मराठशाहीचे हे रूपांतर बाळाजी पेशव्याने घडविले आणि पुढील पुरुषांनी त्याच्या परिपोषाचा उद्योग केला.' (मराठी रियासत, ५ पृ. १३८)

चौथाई सरदेशमुखी :
 मराठा साम्राज्याचा विकास पुढल्या पन्नास वर्षांत जो झाला तो या पद्धतीने झाला. चौथाईसरदेशमुखीची पद्धत शिवछत्रपतींनी सुरू केली होती व मराठ्यांच्या स्वराज्याच्या बाहेरचा जो मुलूख त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घ्यावयाची व त्याच्या बदल्यात एकंदर महसुलाचा चौथा हिस्सा त्यांनी व्यावयाचा आणि ही चौथाई वसूल करण्यासाठी जो खर्च होईल त्यासाठी महसुलाचा दहावा हिस्सा- सरदेशमुखी- त्यांना मिळावयाचा. शेजारच्या राज्यात आपली सेना बसवून तेथे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे व नंतर हळूहळू त्या प्रदेशात आपले राज्य स्थापावयाचे असे हे धोरण होते. ब्रिटिशांनी तैनाती फौजेची पद्धत अवलंबून याच प्रकारे आपले राज्य स्थापिले. तैनाती फौज म्हणजे चौथाई सरदेशमुखीचीच सुधारलेली आवृत्ती होती.
 दिल्लीच्या बादशहाने चौथाईचे हक्क मान्य केले तरी ते बादशहा अत्यंत दुबळे, कर्तृत्वशून्य व नालायक असल्यामुळे त्यांचे निरनिराळ्या प्रांतांवरचे सुभेदार मराठ्यांचे हे हक्क कधीच मान्य करीत नसत. त्यामुळे मराठ्यांना लढाया करून चौथाईचा ऐवज नेहमी वसूल करावा लागत असे. दक्षिणच्या सहा सुभ्यांचे- बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर व हैद्राबाद या प्रदेशांचे- चौथाईचे हक्क बादशहाने बाळाजी विश्वनाथाला दिले; पण या सहा सुभ्यांचा सुभेदार जो निजाम त्याने ते कधीच मान्य केले नाहीत. त्यामुळे मराठ्यांना त्याच्याशी वारंवार युद्धे करूनच ऐवज वसूल करावा लागत असे. निजाम व मराठे यांच्या लढाया झाल्या त्यांचे कारण हेच होते. त्यातूनच निजामाचा उच्छेद होऊन तेथे मराठी राज्याची प्रस्थापना झाली असती. ती का झाली नाही याचा विचार पुढे करू. सध्या या पद्धतीने मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान आक्रमून मोगली सत्ता