पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१५१
 

आणि त्याच्या मागून रंभाजी निंबाळकर, दमाजी थोरात, हिंदुराव घोरपडे, उदाजी चव्हाण, सर्जेराव घाटगे यांनीही तेच केले. याचा अर्थ असा की, स्वराज्य नाही, स्वधर्म नाही आणि स्वामीही नाही ! त्यांच्या ठायी कसलीही निष्ठा नव्हती. त्यांना फक्त स्वतःचे वतन दिसत होते. जो पक्ष प्रबळ होईल, आपल्या वतनाची हमी देईल, त्या पक्षाला ते मिळत. मग तो मोगल असो की मराठा असो. या सरदारांचीच वृत्ती अशी होती असे नाही. कोल्हापूरचा संभाजी हा तर छत्रपतींचा वंशज; पण तोही शाहूविरुद्ध निजामाला मिळाला. खुद्द शिवछत्रपतींचे पुत्र संभाजीमहाराज हे ते जिवंत असतानाच मोगलांना जाऊन मिळाले होतेः मग इतरांचे काय ? पण संभाजीमहाराजांनी शेवटी स्वधर्मासाठी आत्मार्पण करून आपल्या मागल्या दुष्कृत्यांची भरपाई केली. त्या त्यांच्या दिव्य त्यागामुळेच मराठ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आणि त्यांनी महापराक्रम करून स्वातंत्र्ययुद्ध जिंकले; पण संभाजीमहाराज असे एकटेच निघाले. बाकीचे जे वर सांगितलेले लोक त्यांना स्वराज्य वा स्वधर्म यांचे कसलेही सोयरसुतक नव्हते.

नवा मनू :
 सेनापतीसकट सर्व मोठे सरदार मोगलांना जाऊन मिळाल्यामुळे शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या स्वराज्याचे अस्तित्वच धोक्यात आले होते. या वेळी बाळाजी विश्वनाथाचा उदय झाला आणि त्याने या सर्व प्रकारे विघटित व छिन्नभिन्न अशा मराठा समाजातून पुन्हा एक संघटित शक्ती निर्माण केली. ती शक्ती इतकी प्रभावी झाली की, स्वराज्याचा संभाळ तर तिने केलाच आणि शिवाय चढाईचे, आक्रमक धोरण स्वीकारून मराठा स्वराज्याचे साम्राज्य करण्याच्या उपक्रमाचा तिने पाया घातला. मोगल पातशहाचा दक्षिणचा सुभेदार सय्यद हुसेन व त्याचा भाऊ यांना दिल्लीच्या राजकारणात आपले वर्चस्व स्थापित करावयाचे होते. यासाठी त्यांनी या नवनिर्मित मराठा शक्तीचे साह्य मागितले. ही संधी साधून बाळाजी विश्वनाथाने लष्करासह दिल्लीला जाऊन स्वराज्याच्या व दक्षिणच्या साही सुभ्यांच्या चौथाईच्या व सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. बाळाजीच्या या कर्तृत्वाचे वर्णन करताना नानासाहेब सरदेसाई म्हणतात, 'मराठमंडळाचे लक्ष घरगुती भांडणातून काढून बाहेरच्या उद्योगात लावण्याचा बाळाजी विश्वनाथाचा मतलब सिद्धीस गेला, आणि मराठ्यांच्या उद्योगाला