पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ अठरा वर्षे हा संग्राम चालू होता. त्या काळात मराठ्यांचे नेतृत्व करील असा राजपुरुष कोणीच नव्हता. अखिल महाराष्ट्राचा एकमेव नेता असा अन्य पुरुषही या वेळी कोणी नव्हता. तरी औरंगजेबासारख्या अत्यंत प्रबळ शत्रूला मराठ्यांनी खडे चारले. पूर्वीच्या काळात एकेक दोन वर्षांत मुस्लीमांनी हिंदु राज्यांचा पाडाव केला होता. मलिक- काफुराने नर्मदेखालची अवघी दक्षिण पंधरा-वीस वर्षांत पादाक्रांत केली. तेथल्या चारही सत्ता अल्पावधीत धुळीस मिळविल्या; पण आता औरंगजेबासारखा अत्यंत बलाढ्य पातशहा आपल्या सर्व सामर्थ्यानिशी जातीने लढत असताना त्याला मराठ्यांना जिंकता आले नाही. त्याची अफाट सेना, त्याचे धुरंधर सेनापती, पोक्त सरंजाम, अक्षय्य खजिना हे सामर्थ्य मागल्या कोणत्याही मोहिमेपेक्षा भारी होते; पण ते सर्व व्यर्थ झाले, फजीत पावले ! सर्वश्रेष्ठ अशा मुस्लीमसत्तेचाही निःपात करील अशी एक भारी शक्ती महाराष्ट्रात त्या वेळी निर्माण झाली होती याचेच हे द्योतक होय.

निष्ठाहीन सरदार :
 रामचंद्रपंत अमात्य, संताजी, धनाजी, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक, खंडो बल्लाळ या थोर पराक्रमी पुरुषांनी एकजुटीने कार्य करून औरंगजेबासारख्या बादशहाला नामोहरम केले. 'बादशहाने राज्यानिमित्त आपला संपूर्ण पराक्रम व अर्थवैभवादि सर्व शक्ती वेचली. तथापि परिणामी हतोद्यम होत्साता, पराङ्मुख होऊन यमलोकास गेला.' आणि अशा रीतीने मराठ्यांनी स्वातंत्र्ययुद्ध जिंकले. त्यानंतर औरंगजेबाचा पुत्र अजमशहा याने शाहूला सोडून दिले व तो दक्षिणेत आला; पण राजारामाची राणी ताराबाई हिला आपला पुत्र शिवाजी हाच खरा गादीचा वारस आहे असे वाटत होते. त्यामुळे शाहूला सर्व प्रकारे विरोध करण्याची तिने सिद्धता केली आणि त्या तिच्या कृत्यामुळे मराठ्यांची स्वामिनिष्ठा दुभंगली आणि त्याबरोबर स्वराज्यालाही तडा गेला. चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, हिंदुराव घोरपडे इ. प्रमुख सरदार ताराबाईस मिळाले व शाहूचा पक्ष उघडा पडला; पण हे येवढ्यानेच भागले नाही. धनाजी जाधवाचा मुलगा चंद्रसेन जाधव यास शाहूने धनाजीच्या मागे सेनापतिपद दिले होते. तो प्रथम ताराबाईस मिळाला; पण पुढे तिचाही पक्ष सोडून तो सरळ मोगलांना जाऊन मिळाल