पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१४९
 

लोकांना समजावून दिले पाहिजे, त्यांच्या रक्तात उतरविले पाहिजे, हे ध्यानी घेऊन त्यांनी शेकडो ठिकाणी फिरून फिरून ते विवरिले आहे आणि 'विवरिले तेचि विवरावे' असा आपल्या महंतांना आदेश दिला आहे. 'सर्वही पेरणे विद्या लोकांमध्ये हळूहळू, नेणते-जाणते करणे, कथा निरूपणे सदा!' 'लोक हे राखिता राजी सर्व राजीच होतसे.' 'जन हे वोळती तेथे अंतरात्माचि वोळला.' 'समर्थापाशी बहुतजन, राहिला पाहिजे साभिमान', 'जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक,' 'जनी जनार्दन वोळला, मग काय उणे तयाला?' 'जो मानिला बहुतांसी, कोणी बोलो न सके त्यासी, धगधगीत पुण्यराशी महापुरुष' या वचनांमधून समर्थांना लोकशक्तीचा, राष्ट्रकल्पनेचा साक्षात्कार कसा झाला होता आणि 'जे आपणांसि ठावे झाले ते इतरांस शिकवून सकळ जन शहाणे करण्याचा' त्यांनी केवढा प्रयत्न चालविला होता हे ध्यानी येईल.
 भारतातल्या इतर प्रदेशांत हे संघटनतत्त्व त्या काळी कोणी जाणले नव्हते. 'रजपूत तेवढा मेळवावा', 'गुर्जर तेवढा मेळवावा' बंगाली, पंजाबी, कर्नाटकी, तामिळी यांची या तत्त्वावर संघटना करावी, असे स्फुरण महाराष्ट्राखेरीज अन्यत्र कोठेही झाले नव्हते. इस्लामी आक्रमणाचा निःपात करण्यात मराठ्यांना इतरांपेक्षा जास्त यश आले आणि एका शतकाच्या आतच त्यांनी ते कार्य पुरे करून टाकले याचे हे कारण आहे. स्वराज्य व स्वधर्मं यांचा संयोग तर त्यांनी घडवून आणलाच. 'देवद्रोही तितुके कुत्ते, मारूनि घालावे परते' देवदास पावती फते, यदर्थी संशय नाही ॥, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुखबडवा का बुडवावा, धर्मसंस्थापनेपाठी ॥ या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हांकरिता ॥ या वचनांवरून ते स्पष्टच आहे; पण त्याशिवाय मराठ्यांचे एक राष्ट्र घडवावे, या नव्या तत्त्वावर या समाजाची संघटना करावी, हे या दोन महापुरुषांचे प्रयत्न होते, हे वरील विवेचनावरून ध्यानी येईल. महाराष्ट्रात सतराव्या व अठराव्य शतकांत जी भारतव्यापी अशी एक प्रचंड शक्ती निर्माण झाली ती संघटनेच्या या नव्या तत्त्वातून निर्माण झाली यात शंका नाही.

स्वातंत्र्य युद्ध :
 या शक्तीचेच प्रत्यंतर औरंगजेबाशी झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात आले. संभाजी-