पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

सुंदरा ते अनन्या' हे स्तोत्र लिहून संसाराचा गौरव केला, धनाचे माहात्म्य जाणून लोकांना 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' हे समजावून दिले, 'शक्तीने मिळती राज्ये,' हे रोकडे सत्य समाजमनावर बिंबविले, 'यत्न तो देव जाणावा' 'साक्षेपी वंश देवाचे, आळशी वंश दानवी' हे सांगून दैववादाची निर्भर्त्सना केली आणि अशा रीतीने मराठासमाजाला काही अंशी भौतिक दृष्टी दिली. हे त्यांचे कार्य असामान्यच आहे; पण त्यांचे खरे कार्य म्हणजे या समाजाला त्यांनी एक नवे संघटनतत्त्व दिले हे होय. 'मराठा तितुका मेळवावा' हे ते महातत्त्व होय. शिवछत्रपतींना याच तत्त्वाचा साक्षात्कार झालेला होता. त्यांनी मराठा समाजाची संघटना करण्याचे कार्य आरंभिले ते याच तत्त्वावर. समर्थांनी याच तत्त्वाचे विवेचन केले आणि त्याच्या दृढीकरणासाठी मठांची स्थापना करून सर्व समाजात ते प्रसृत करण्याचा प्रयत्न केला.
 पूर्वपरंपरा, मातृभूमी व भाषा यांच्या अभिमानाने पृथगात्म झालेल्या समाजाची जी संघटना ते राष्ट्र होय. या राष्ट्रकल्पनेचा उदय युरोपात नुकताच झाला होता आणि इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली अशी भिन्न राष्ट्रे तेथे उदय पावत होती. त्यांपैकी राष्ट्रतत्त्वावर प्रत्यक्ष समाजसंघटना करण्याचे साधले ते फक्त इंग्लिशांना. इतर लोकांना एकुणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यात यश आले नव्हते. अशा या 'राष्ट्र' शक्तीचे दर्शन भारतात सतराव्या शतकात समर्थांना व्हावे यातच त्यांचे अलौकिकत्व आहे. 'राष्ट्र' तत्त्वाच्या बुडाशी समाजशक्तीची जागृती, हा विचार प्रधान आहे हे जाणूनच समर्थांनी त्या शक्तीचे महत्व समाजाला पटवून देण्याचे यावत्शक्य प्रयत्न केले. 'सकल लोक एक करावे, गलीम निवटून काढावे, ऐसे करिता कीर्ती धावे दिगंतरी ॥ बहुत लोक मेळवावे, एकविचारे भारावे, कष्टे करूनि घसरावे म्लेंछावरी ॥ आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥' या संभाजीला लिहिलेल्या पत्रातील तीन ओव्यांत समर्थांचे सर्व तत्त्वज्ञान स्पष्ट झाले आहे. राष्ट्र घडवावयाचे म्हणजे 'लोक' ही शक्ती जागृत व संघटित केली पाहिजे हे समर्थांनी अचूक जाणले होते. हे लोक एका मर्यादित भूभागातील असून काही वैशिष्ट्याने इतरांपासून पृथक असले पाहिजेत, त्यांना स्वतंत्र अस्मिता निर्माण झाली पाहिजे हेही त्यांनी आकळिले होते. म्हणूनच 'मराठा तितुका मेळवावा, आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा' हा त्यांचा आग्रह होता. हे नवे तत्त्व आहे हे