पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१४७
 

त्यासाठी आपसात त्यांच्या कायमच्या लढाया चालू असत. अवचित छापा घालून एकमेकांची घरेदारे जाळून टाकणे, बायकामुलांसकट सर्वाची कत्तल करणे, कपटाने खून करणे, हे त्यांचे नित्याचे उद्योग होते. अशा या मराठ्यांना छत्रपतींनी एक नवी दृष्टी दिली. त्यांच्या ठायी आपण सर्व 'मराठे' आहो ही भावना निर्माण केली आणि स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना देऊन त्यांच्यांत नवचैतन्य निर्माण केले. जदुनाथ सरकार यांनी शिवछत्रपतींच्या कार्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. ते म्हणतात: "शिवाजी हा हिंदुजातीने निर्माण केलेला शेवटचा महाप्रज्ञासंपन्न असा राष्ट्रनिर्माता होय. त्याची सृष्टी- त्याची सेना, त्याचे आरमार व त्याच्या संस्था- ही त्याची स्वतःची होती. त्यात इतरांच्या अनुकरणाचे काही नव्हते. त्याच्या उदयापूर्वी मराठा समाज अनंत सवत्या सुभ्यांमुळे छिन्नभिन्न झाला होता. त्यांना संघटित करून त्यांचे त्याने एक राष्ट्र घडविले आणि दिल्लीचे मोगल, विजापूरचे पातशहा, गोव्याचे पोर्तुगीज व जंजिऱ्याचे हबशी या सत्तांशी मुकाबला करून त्यांची आक्रमणे निर्दाळून, त्याने हे साधले, हे विशेष होय. त्याच्यापूर्वी मराठे हे सरदार होते; पण ते परक्यांचे दास होते. राज्यकारभारात त्यांना कसलेही स्थान नव्हते. ते लढाईत पराक्रम करीत, आपले रक्त सांडीत; पण ते परक्यांचे सेवक म्हणून. लढाईचे नेतृत्व त्यांच्याकडे नव्हते. अशा स्थितीत दिल्ली व विजापूर यांना आव्हान देऊन आपण स्वतंत्रपणे युद्धाचे नेतृत्व करू शकतो हा आत्मविश्वास शिवाजीने त्यांच्या ठायी निर्माण केला. हिंदुजात ही राष्ट्र निर्माण करू शकते, सेना व आरमार निर्माण करू शकते व स्वराज्य स्थापून ते यशस्वी करू शकते हे त्याने सिद्ध करून दाखविले. हिंदुत्व हा वठलेला वृक्ष नसून अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतरही तो पुन्हा फुटू शकतो, शाखापल्लवांचा त्याला अजूनही बहर येणे शक्य आहे आणि अनेक शतकांच्या अत्याचारांनंतरही पुन्हा उठून गगनाला भिडण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी आहे हे शिवाजीने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले." (शिवाजी अँड हिज टाइम्स, ५ वी आवृत्ती, पृ. ३८५-८६).

नवे संघटना-तत्त्व :
 ही महाक्रान्ती घडविण्याच्या कार्यात छत्रपतींना समर्थांचे सर्वतोपरी साह्य झाले हे विश्रुतच आहे. समर्थांनी प्रवृत्तिधर्माचा उपदेश केला, 'मनासारिखी