पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
 

किंवा राष्ट्र या पदवीला जावयाचे असेल तर काही किमान अपेक्षा तरी त्याने पुऱ्या करणे अवश्य असते. अनेक सांस्कृतिक बंधनांनी, अनेक निष्ठांच्या चिवट धाग्यांनी, अनेक श्रद्धांच्या सूत्रांनी तो समूह दृढबद्ध असला पाहिजे. अनेक आचार, परंपरा, दैवते, श्रद्धास्थाने, पुण्यपुरुष, अनेक मानबिंदू, पुण्यग्रंथ ही आपणा सर्वांची एक आहेत, सर्वांना सारखीच वंद्य आहेत, ही जाणीव त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीच्या ठायी जागृत असली पाहिजे. या जाणिवेमुळेच या समूहातील सर्व घटकांची सुखदुःखे एक होतात, रागद्वेष समान होतात, सर्वांचे अभिमान सुसंवादी होतात- म्हणजेच तो समूह एकरूप होतो. सर्वांचे पूर्वपरंपरांचे अभिमान एककेन्द्र असले, वर्तमान सुखदुःखे अभिन्न असली आणि भविष्यकालच्या आकांक्षा आणि ध्येये समरूप असली म्हणजे तो लोकसमूह समाज या पदवीला पात्र होतो. समूहाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाच्या दृष्टीने याची फार आवश्यकता असते. सर्वांचे रागद्वेष, सुखदुःखे व अभिमानस्थाने अभिन्न असली तरच समूहातील कोणाही एकावर आघात झाला तर तो स्वतःवरच झाला असे समजून सर्व समाज खवळून उठतो. आणि असा सामूहिक संताप ज्या समूहात उद्भवू शकतो तोच स्वसंरक्षण करू शकतो. अन्यथा तो दुबळा होऊन परक्यांच्या भक्ष्यस्थानी पडतो. आत्मरक्षणाला, स्वातंत्र्य संरक्षणाला जो समूह समर्थ नाही त्याला समाज किंवा राष्ट्र म्हणणे शक्य नाही.
 समआचारविचार, समप्रतिष्ठा, अभिन्न श्रद्धास्थाने, एकरूप ध्येयाकांक्षा या निकषांवर घासून पाहता हिंदुलोकसमूह हा समाज ठरेल काय ? कोठल्याही श्रद्धास्थानाचा, मानबिंदूचा अवमान झाला तर अखिल समाज संतप्त होऊन खवळून उठला पाहिजे, प्राणान्त प्रतिकाराला सज्ज झाला पाहिजे हे लक्षण हिंदुसमाजात दिसते काय ? आज दिसत नसले तर पूर्वी कधी दिसत होते काय ? आणि या लक्षणांनी संपन्न होऊन आत्मरक्षणाचे सामर्थ्य हिंदूंनी कधी प्राप्त करून घेतले होते काय ?
 वर सांगितलेच आहे की गेली शंभर-दीडशे वर्षे तरी हिंदू विचारवंतांच्या मनाला हा प्रश्न त्रस्त करीत आहे. ज्ञानकोशकारांनी १९२० साली आपली चिंता पुढीलप्रमाणे व्यक्त केली आहे : 'भारतीय संस्कृतीची अंगे चोहोकडे पसरली, तिने अनेक लोकांवर छाप टाकली, आणि बऱ्याच लोकसमुदायास