पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

मनावर ठसविणे, स्वराज्य व साम्राज्य यांना पाठमोरा झालेला धर्म त्या ध्येयाच्या मागे उभा करणे, थोडक्यात म्हणजे स्वराज्य व स्वधर्म यांचा संयोग घडवून धर्माला समाज संघटनेचे तत्त्व मानणे हीच ती क्रान्ती होय. महाराजांनी विचार केला, "आपण हिंदू, सर्व दक्षण देश म्लेंच्छांनी व्यापला. धर्म बुडविला. हा रक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षू व आपले पराक्रमाने नवीन दौलत संपादू. पुरुष प्रयत्न बळवत्तर, दैव पंगू आहे, यास्तव प्रयत्ने अचल करावे, त्यास दैव जसजसे सहाय होईल तसतसे अधिक करीत जावे, देव परिणामास नेणार समर्थ आहे." धर्मरक्षणासाठी प्राण वेचावे लागतात, हा विचार या भूमीतून नाहीसाच झाला होता. छत्रपतींनी तो येथे रूढविला आणि त्यामुळे तीनशे वर्षांत येथे जे घडू शकले नव्हते ते चमत्कारासारखे पाचपंचवीस वर्षांत घडून आले. महाराजांना नवी दौलत संपादावयाची होती आणि रूढ हिंदुधर्म तर दर पावलाला त्यांना अडवीत होता. त्यामुळेत्या रूढ धर्मकल्पनांचा उच्छेद करीतच त्यांना मार्ग क्रमावा लागला. समुद्र- गमननिषेधाची रूढी त्यांनी झुगारून दिली व जलदुर्ग बांधून आरमार निर्माण केले. पतितांची शुद्धी रूढ धर्मशास्त्राला मान्य नव्हती, पण ते धर्मशास्त्र बाजूस ठेवून त्यांनी नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना परत स्वधर्मात वेतले. 'कलावाद्यंतयोः स्थितिः।' कलियुगात ब्राह्मण व शूद्रच फक्त आहेत,क्षत्रिय वैश्यांचे अस्तित्वच नाही, हे महामूर्ख वचन तर त्यांनी अगदी हेटाळून टाकले व 'क्षत्रियकुलावतंस' असे स्वतःला म्हणवून घेऊन विधियुक्त राज्याभिषेकही त्यांनी करवून घेतला. त्या काळी हिंदुधर्माला इतके हीन व समाजघातक रूप आले होते की, ज्याला काही 'नवे साधावयाचे' होते त्याला त्यात आमूलाग्र परिवर्तन घडविल्यावाचून गत्यंतरच नव्हते आणि 'नवे साधावे हेच या कुलात जन्मल्याचे सार्थक' हे तर छत्रपतींचे ब्रीद होते.

छत्रपतींची नवी सृष्टी :
 छत्रपतींनी हे 'नवे' काय साधले? त्यांनी या महाराष्ट्रभूमीत नवे राष्ट्र निर्माण केले सुर्वे, मोरे, सावंत, जेधे इ. मराठा देशमुख, सरदेशमुख, सरंजामदार, वतनदार हे सर्व विजापूरचे ताबेदार होऊन आपापल्या मुलखातील प्रजेकडून महसूल वसूल करून पातशहाकडे त्याचा भरणा करणारे त्याचे मुनीम झाले होते आणि आपल्या वतनापलीकडे त्यांना कसलीच दृष्टी नसल्यामुळे