पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१४५
 


विठ्ठलाच्या लीला :
 बहामनी इतिहासाचे समालोचन करताना नानासाहेब सरदेसाई लिहितात- 'त्या काळचे सर्व इतिहास मुसलमानांनी लिहिलेले आहेत. हिंदूंनी लिहिलेला एकही इतिहास- ग्रंथ नाही. त्या राज्यामध्ये मुसलमानांचे वर्चस्व असे. हिंदू लोक हलक्या नोकऱ्या व शेतीभाती करून स्वस्थ असत. ब्राह्मणी राज्यात इतकी बंडे झाली, इतक्या लढाया झाल्या व इतक्या राज्यक्रान्त्या झाल्या, पण कोणत्याही खटपटीत हिंदू लोक अग्रेसर असल्याचे आढळत नाही.' (मुसलमानी रियासत, भाग १ ला, आवृत्ती १८९८, पृ. २७२) बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यावर अनेक मराठा सरदार उदयास आले; पण आश्चर्याची गोष्ट अशी की, एकही सरदार कधी विजयनगरच्या हिंदू राजांना मिळाला नाही किंवा एकाही पंडिताने विजयनगरपासून स्फूर्ती घेऊन राजधर्म, प्रवृत्तिवाद शिकविणारा ग्रंथ लिहिला नाही. स्वराज्य, स्वातंत्र्य या कल्पनांना ते किती पारखे झाले होते हे त्यांनी विठ्ठलाच्या ज्या लीला वर्णन केलेल्या आहेत त्यांवरून स्पष्ट दिसते. परमेश्वर नेहमी भक्तांसाठी धावत येत असे आणि तो काय करीत असे ? मुस्लीम सत्ता नष्ट करावी, हिंदू सन्य निर्माण करावे, लढायांत हिंदूंना जय मिळवून द्यावा, असे उद्योग त्याने केले काय ? मुळीच नाही. जनाबाईला दळण- कांडणाला मदत करणे, सेना न्हाव्याचे रूप घेऊन बादशहाची हजामत करणे, महाराचे रूप घेऊन पैशाचा भरणा करणे, देवळाचे तोंड पूर्वेकडून पश्चिमेला फिरविणे या लीलांत तो मग्न असे. सेना न्हावी किंवा दामाजी या भक्तांना छळणाऱ्या बादशहांना पदभ्रष्ट करून मराठ्यांना सत्तारूढ करावे असे देवाच्या कधी स्वप्नातही आले नाही ! पण माणसांच्या स्वप्नांत जे आले नाही ते देवाच्या कसे येणार ? माणसांना त्या काळी स्वराज्य, स्वातंत्र्य हे स्वप्नातही दिसत नव्हते. तीनशे वर्षांनी समार्थाना ते दिसले आणि 'स्वप्नीं जें देखिलें रात्रीं तें तें तैसेंचि होतसे' या न्यायाने ते प्रत्यक्षात घडूनही आले.

रूढ धर्माचा उच्छेद :
 तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर शिवछत्रपतींना स्वराज्याची स्थापना करण्यात यश आले ते त्यांनी आधी धर्मक्रान्ती घडवून आणली यामुळेच होय. व्यक्तिधर्माला समाजधर्माचे रूप देणे, राजधर्मात सर्व धर्माचा समावेश होतो हे लोकांच्या
 १०-११