पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

म्हटले आहे की, कलियुगामुळे धर्म क्षीण झाला होता, त्याला त्यांनी पुन्हा तरुणता प्राप्त करून दिली. पण या तरुणतेत मंदिरांचे व स्त्रियांचे रक्षण हे येत नव्हते. मग काय येत होते ? हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणीवरून ते कळेल. व्रते- वैकल्ये, उपासतापास, तिथिवार, नक्षत्र, त्यांची त्यांची पक्वान्ने, देवांच्या आवडी- निवडी, या सर्वात धर्माचे तारुण्य होते. मंदिरांच्या रक्षणाचा, आक्रमणाच्या प्रतिकाराचा त्याशी काही संबंध नव्हता. विद्यारण्य, विद्यातीर्थ यांनी आक्रमणाच्या प्रतिकाराचा व धर्माचा संबंध अविभाज्य मानून त्या तत्त्वाचा प्रसार कर्नाटकात केला तसा देवगिरीच्या पंडितांनी केला असता तर मलिक काफूरला नर्मदेच्याखाली उतरता आलेच नसते. पण महाराष्ट्रात हिंदुधर्माला राजधर्मांचे, राष्ट्रधर्माचे रूप आलेच नाही. तीनशे वर्षांनी छत्रपतींनी व समर्थांनी ते रूप दिले, धर्मक्रान्ती केली तेव्हा स्वराज्यस्थापना झाली.
 या तीनशे वर्षांच्या काळात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम हे संत महाराष्ट्र समाजाचे धर्मक्षेत्रातील नेते होते. पण हे संत व त्यांचे अनुयायी पूर्णपणे निवृत्तिवादी होते. संसार, स्त्रीपुत्र, धनवित्त, राज्य, ऐश्वर्य यांची त्यांनी कमालीची निंदा केली आहे. त्यांचा भक्तिमार्ग हा व्यक्तिधर्म होता. लो. टिळकांनी म्हटल्याप्रमाणे भागवतधर्म हा मूळचा प्रवृत्तिवादी. गीतेतला कर्मयोग तो हाच. पण भागवतपुराणाचा भागवतधर्म हा त्याहून निराळा आहे. तो निवृत्तिवादी व व्यक्तिनिष्ठ आहे. संतांनी त्याचाच महाराष्ट्रात प्रसार केला. या धर्मामुळे हिंदू हे निदान हिंदू तरी राहिले, नाही तर सर्व महाराष्ट्र व हिंदुस्थानही इस्लाममय झाला असता, हे राजवाड्यांचे म्हणणे काहीसे खरे आहे; पण विजयनगरचे साम्राज्य झाले नसते, तेथील सम्राटांनी इस्लामच्या प्रसाराला लष्करी सामर्थ्याने पायबंद घातला नसता, महाराष्ट्रातील बहामनी राज्यावर सारखी धाड घालून त्याला हतप्रभ केले नसते तर महाराष्ट्र इस्लाममय होण्याचे कितपत टळले असते याची शंकाच आहे. आणि येथे नंतर शिवछत्रपतींचा उदय झाला नसता तर हिंदुस्थानवरची ती आपत्ती टळली असती असे वाटत नाही. या दोन प्रवृत्तिधर्मांच्या शक्ती निर्माण झाल्या नसत्या तर सिंध, अयोध्या, बंगाल, बिहार येथल्याप्रमाणे मुमूर्षू स्थितीत फार तर, हिंदू टिकून राहिले असते.