पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१४३
 

मंगरुळ गावी मंगळ नावाचा राजा होता. त्याची व कलंदरची झटापट होऊन मंगळ मारला गेला. त्यामुळे कलंदराचा वचक सर्वत्र बसून हिंदूंना इस्लामधर्माची दीक्षा देण्याचे कार्य त्याला निर्वेधपणे करता आले. हा इ. स. १२५८ मध्ये मृत्यू पावला. १२७० च्या सुमारास वरंगळमध्ये काकतीयांचे राज्य होते. त्यांच्या राजवटीत अतिशय दंडेली करून मुस्लीम सूफी लोक धर्मप्रसार करीत होते. त्यांत जे मारले जातील त्यांना ते शहीद समजत व त्यांचे गुणगान करून लोकांना चेतवीत आणि हे सर्व हिंदू राजांच्या राजवटीत चाले.

हिंदुधर्माची तरुणता :
 १२९६ साली अल्लाउद्दिनाने देवगिरीवर स्वारी केली. त्याच्या पाठोपाठ मुंतजबोद्दिन जर्जरीबक्ष हा सातशे सहकाऱ्यांना बरोबर घेऊन इ. स. १३०० मध्ये दक्षिणेत येऊन दौलताबादेजवळ खुल्ताबाद येथे स्थायिक झाला. मोईजोद्दिन हा त्याचा सहकारी त्याच्याबरोबरच आला होता. हा नंतर पैठणास गेला व तेथे असलेली महालक्ष्मी, रेणुकादेवी व गजानन यांची मंदिरे पाडून तेथे त्याने मशिदी उभारल्या. महानुभावांच्या स्थानपोथीत 'महालक्ष्मीचे देऊळ, पूर्वाभिमुख, एकवीरा दक्षिणाभिमुख विनायेकू, त्याची मसीद केली' असा उल्लेख आहे. पैठणला असा जम बसल्यावर पुणे, पेण, विजापूर, येथे आपले शिष्य पाठवून त्याने हिंदूंना इस्लामची दीक्षा देण्याचे काम सपाट्याने सुरू केले. लक्ष्मी, रेणुका, गजानन यांची मंदिरे पाडली गेली तेव्हा पैठणला यादवांचीच सत्ता होती; पण त्यांनी या इस्लामी आक्रमणाचा कसलाही बंदोबस्त केला नाही. (सूफी संप्रदाय- सेतुमाधवराव पगडी- प्रकरण ९ वे.) एक राजा फार तर गाफील असेल; पण इतर सरदार, सेनापती, हेमाद्रीसारखे पंडित काय करीत होते ? या अत्याचाराची कोणीही दखल घेऊ नये याचा अर्थ काय होतो ? या अत्याचारांचा अर्थ काय, त्यांतून कोणते संकट कोसळण्याची शक्यता आहे, त्याचा राज्यनाशाशी किती निकट संबंध आहे हे काही जाणण्याची ऐपतच देवगिरीला कोणाच्या ठायी नव्हती असे दिसते. राज्यनाश लांब राहिला. या हिंदुदेवता आहेत, ही धर्मपीठे आहेत, त्यांचा धर्माशी संबंध आहे हे तर त्यांना कळत होते ना ? पण तरीही त्यांना चीड आली नाही, त्यांचा संताप झाला नाही. ते सर्व याविषयी उदासीन होते. यादव राजांची स्तुती करताना, हेमाद्रीने