पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 


मुस्लीम धर्म व राज्य :
 हे विधान जरा विचित्र व अत्युक्त वाटेल; पण मागल्या प्रकरणातील स्वराज्य व स्वधर्म यांच्या अभेदाविषयीचे विवेचन पुन्हा जरा बारकाईने वाचले तर ते अगदी यथार्थ आहे असे ध्यानात येईल. मुस्लिमांनी या अभेदाचा कधी विसर पडू दिला नव्हता. जेव्हा जेव्हा ते स्वाऱ्या करीत, आक्रमणे करीत, राज्ये स्थापीत तेव्हा त्यामागे धर्मप्रसार हा एक प्रधान हेतू निश्चित असेच असे. जो जो मुस्लीम तो जवळचा व हिंदू हा निश्चित शत्रू ही भूमिका त्यांनी, काही अपवाद वजा जाता, कधी सोडलीच नाही. त्यामुळे राज्य स्थापन करताच सक्तीने धर्मांतर करणे आणि हिंदूंच्या कत्तली करणे किंवा त्यांवर जिझीया कर लादून व इतर बंधने घालून, त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना जगणे असह्य करून टाकणे हे धोरण ते अवलंबीत. आज पाकिस्तानात हेच चालले आहे. मग त्या मागल्या काळी काय असेल याची कल्पनाच करणे बरे. सत्ता हाती येण्यापूर्वीही मुल्ला, मौलवी, अवलिया हे त्या प्रदेशांत ठाण मांडून धर्मप्रसाराचा उद्योग चालू करीत आणि या धर्मप्रसारातूनच राजसत्तेचा पाया रचीत. उलट हिंदू या काळच्या सुमारास संन्यास, निवृत्ती, मायावाद, मोक्ष, परलोक यांच्या आहारी जाऊन स्वराज्य, साम्राज्य यांविषयी उदासीन होत चालले होते. त्यामुळे हाती राजसत्ता असूनही राज्य चालविण्यासाठी जो साक्षेप, जी सावधता, जी दूरदृष्टी अवश्य असते ती त्यांच्या बुद्धीतून नष्ट होत चालली होती.
 यादवांचे राज्य असतानाच सूफी पंथाच्या मुस्लीमांनी महाराष्ट्रात जो धर्मप्रसार केला त्यावरून या विधानाची सत्यता ध्यानी येईल. दौलताबाद (देवगिरी) व त्याच्याजवळचे खुल्ताबाद येथे मोमीन आरीफ व जलालुद्दिन गुंजरवा या मुसलमान साधूंच्या कबरी आहेत. हे दोघेही तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात, म्हणजे यादवांच्या राजवटीतच, दक्षिणेत धर्मप्रसाराचे कार्य करीत होते. सूफी सरमस्त हाही अरबस्थानातून तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे येऊन स्थायिक झाला होता. त्याच्याबरोबर शेकडो फकीर व शिष्य होते. दिल्लीहून त्याच्या मदतीकरिता आलेल्या पठाणांच्या साह्याने तेथील सुभेदाराला मारून त्याने मुस्लीम धर्मप्रसाराचे कार्य सुरू केले. हा १२८० च्या सुमारास मृत्यू पावला. दुसरा एक सूफी हयात कलंदर हा वऱ्हाडात मंगरूळपीर येथे याचे आधीच ते कार्य करीत होता.