पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१४१
 

बीजे बहामनी सत्तेच्या ठायीही होती. शिया व सुनी हा भेद तर दर पिढीला जाणवत असे. एक सुलतान शिया तर त्याचा मुलगा सुनी. यामुळे दरवेळी सर्व कारभाराला हादरा बसे. दक्षिणी- परदेशी हा भेद तर इतका विकोपाला गेला होता की, राजधानीत त्यामुळे वरचेवर तीन-तीन चार-चार दिवस वेबंदशाही माजे, रक्तपात होई. दर पिढीला वारसाचे कलह कायम चालू असत. बहुतेक सुलतान व्यसनासक्त, मद्यपी, विलासमग्न असत. सरदारांची वैमनस्ये एकमेकांच्या खुनापर्यंत जात. अशा स्थितीत कोणत्याही सत्तेला दृढता येणे शक्यच नव्हते; पण तरीही मराठ्यांना तो बहामनी सत्ता नष्ट करता आली नाही. १४९० च्या सुमारास बहामनी सत्तेची पाच शकले झाली व आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा त्या एकीच्या पाच शाह्या झाल्या. यामुळे तर ती सत्ता आणखीच कमजोर झाली. पण यांपैकी एकाही शाखेचे राज्य हिंदूंना साडेतीनशे वर्षांत घेता आले नाही. विचित्र गोष्ट अशी की, एलिचपूरला इमादशाही स्थापन करणारा फत्तेउल्ला व अहमदनगरला निजामशाही स्थापन करणारा बहिरी हे मूळचे हिंदु ब्राह्मण होते. ते हिंदू असताना स्वतंत्र राज्य स्थापणे त्यांना शक्य झाले नाही; पण मुसलमान होताच ते कर्तृत्व त्यांच्या ठायी सहज आले, याचा हिंदुधर्मशास्त्राने फार गंभीरपणे विचार केला पाहिजे. विजापूर स्थापणारा यूसफ आदिलशहा हा तुर्कस्थानातून आलेला व बेदरचा कासम बेरीद येथलाच पण गुलाम होता. त्या दोघांना स्वतंत्र सत्ता स्थापन करणे सहज शक्य झाले. पण हिंदूंतील चंद्रसूर्यवंशांतल्या, छत्तीस कुळांतल्या, मौर्य, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांच्या कुळांतल्या कोणालाही हे जमले नाही. बहामनी राज्य स्थापन झाले त्या वेळची हकीकत अशीच उद्वेगजनक आहे. या राज्याचा संस्थापक हसन ऊर्फ जाफरखान हा मूळचा एक गुलाम. केवळ आपल्या कर्तृत्वाने वर चढत जाऊन सरदार झालेला आणि तघ्लखाचा सेनापती म्हणून दक्षिणेत आलेला. त्याला दिल्लीच्या सत्तेला शह देऊन दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापिता आले. याच वेळी सिसोदे कुळातील दोन पुरुष सजनसिंह व क्षेमसिंह हेही दक्षिणेत, महाराष्ट्रात आले होते. त्यांनी काय पराक्रम केला ? त्यांनी दक्षिणेत राज्य स्थापण्यास जाफर खानाला साह्य करून त्याच्याकडून दहा गावांची जहागीर मिळवली ! तो गुलाम, त्याने राज्य स्थापिले आणि हे राजपुत्र, यांनी पाटिलकी मिळवली व गुलामी स्वीकारली ! कारण तो मुसलमान होता व हे हिंदू होते.