पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

व हिंदुसंस्कृती यांचे रक्षण केले हे खरे. पण दोन्ही सत्ता शेवटी मुस्लीमांनीच बुडविल्या हेही खरे आहे. मुस्लीमांत वंशभेद, पंथभेद, प्रांतभेद अतिशय होते. वारशाची युद्धे त्यांच्यात दर पिढीस चालत. मध्यवर्ती सत्तेपासून फुटून निघणे हे तर नित्याचेच होते. असे असूनही दोन्ही वेळा अखेरी त्यांनीच मारली आणि हिंदुसत्ता नामशेष केल्या. असे का झाले याचेच विवेचन वर केले आहे. राष्ट्रीय भावना हिंदूंच्या ठायी नव्हती पण तशी ती मुस्लीमांतही नव्हती. पण धर्म हे तत्त्व मुस्लीमांनी अनेक वेळा श्रेष्ठ मानले. स्वराज्य व स्वधर्म यांचे ते अद्वैत मानीत. हिंदूंच्या बाजूने मुस्लीमांशी लढणाऱ्याला ते धर्मभ्रष्ट समजत. अशी तीव्र व उत्कट धर्मनिष्ठा अखिल हिंदुसमाजात कधीच निर्माण झाली नाही. विद्यारण्य, हरिहर, बुक्क यांनी काही काळ ती निर्माण केली होती. तिच्या बळावर हिंदूंनी तीनशे वर्षे मुस्लीमांचा प्रतिकार केला व दक्षिणेचे रक्षण केले यासाठी हिंदुसमाज, हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती त्यांची कायमची ऋणी राहील यात शंकाच नाही. पण ही मानवंदना दिल्यानंतर हिंदूंच्या जीवशक्तीविषयी पुन्हा विचार करू लागताच तिच्यातील वैगुण्ये मनापुढे उभी राहतातच. विजयनगरने तीनशे वर्षे लढा दिला हे कौतुकास्पद आहे. पण त्या सत्तेचाही नाश करून तिच्याच जन्माच्या वेळी स्थापन झालेली बहामनी सत्ता अनेक शाह्यांत दुभंगलेली असूनही आणि दिल्लीच्या मोगल बादशाहीचे वारंवार प्राणघातक हल्ले होत असूनही विजयनगर नंतर आणखी शंभर वर्षे टिकून राहिली हे आपण विसरता कामा नये. राजस्थान एकछत्र कधी झाले नव्हते; पण विजयनगरने तुंगभद्रेच्या दक्षिणेस अखंड एकछत्र टिकवून धरण्यात अपूर्व यश मिळविले होते. पण मरणमारणाच्या दीर्घकालीन संग्रामात शेवटी या सत्तेला हार खावी लागली. अखिल भारतातून मुस्लीम सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यात तिला यश आले नाही. ते यश मराठ्यांना आले. तेव्हा विजयनगर कोठे कमी पडले व मराठे या कार्यात यशस्वी का झाले याची कारणमीमांसा आपण केली पाहिजे. पुढच्या प्रकरणात तो प्रयत्न करावयाचा आहे.

§