पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१३७
 

जींजी, मदुरा व म्हैसूर येथील नायकांना संघटित होण्याची विनंती केली, पण त्यांना ती मान्य झाली नाही. ते तटस्थच राहिले. मग मीरजुम्ला, मुस्ताफाखान व शहाजी भोसले या विजापूरच्या सरदारांनी एकेकाचा पराभव करून १६५२ मध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा समूळ उच्छेद केला. दक्षिणेतील हिंदूराज्ये बुडविण्याचे फार मोठे श्रेय शहाजी राजे भोसले यांना आहे, हे इतिहासाला माहीत आहे. शहाजी राजे हे मोंगल, विजापूर, अहमदनगर यांच्या सेवेत होते. कधी विजापुरशी फितुरी करून ते मोगलांना मिळत, कधी अहमदनगरच्या निजामशहाला मिळत. पण या सर्वांना सोडून दक्षिणेतल्या हिंदुसत्तांना ते कधीही मिळाले नाहीत. इतकेच काय त्यांचा पुत्र पराक्रमी झाला, त्याला १६६० सालापर्यंत यशही घवघवीत मिळाले, तरी त्या वेळी विजापूरची सेवा सोडून ते आपल्या पुत्रालाही मिळाले नाहीत ! आपल्या प्रचंड सरंजामानिशी ते त्या वेळी छत्रपतींना सामील झाले असते तर दक्षिणेच्या सर्व शाह्या त्याच वेळी नामशेष झाल्या असत्या. हे त्यांचेच असे नाही. राजा भगवानदास, मानसिंग जयसिंग, सवाई जयसिंग, लखूजी जाधव, मुरार जगदेव, जगदेवराव पवार, आक्कणा, मादण्णा या थोर सरदारांनी मुस्लीम राज्यविस्तारासाठी जे पराक्रम केले त्याच्या शतांश जरी हिंदुराज्य स्थापनेसाठी केले असते तरी भारतात मुस्लीम सत्ता नामशेष झाली असती. हे सरदार हिंदू होते. पण स्वधर्मनिष्ठेत स्वातंत्र्य निष्ठेचा अंतर्भाव होतो हे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या धर्मनिष्ठेपेक्षा त्यांची मुस्लीमस्वामिनिष्ठा शतपटींनी जास्त उत्कट होती. याचा अर्थच असा की 'हिंदुधर्म' या संज्ञेला हिंदुधर्मशास्त्रकरांनी अत्यंत विकृत असा अर्थ प्राप्त करून दिला होता. व्रते, उद्यापने, प्रायश्चित्ते यांना त्यांत महत्त्व होते. जात संभाळण्याला, अस्पृश्यांना न शिवण्याला, शुद्धिबंदीला त्यात महत्त्व होते. पण स्वातंत्र्याला नव्हते ! मूर्तिपूजेत हिंदु धर्म होता. मूर्तिरक्षणात तो नव्हता. परदेशगमन त्याला निषिद्ध होते, परदास्य नव्हते. मुस्लीमांना राजे मानण्यास हिंदुधर्मशास्त्रकार तयार होते, पण हिंदुराजे त्यांना मान्य नव्हते. कारण त्यांच्या मते ते क्षत्रिय नव्हते ! असो.
 रजपूत व विजयनगर यांच्या उत्कर्षापकर्षाचा येथवर विचार केला. हा इतिहास म्हणजे हिंदुसमाजाच्या संघटनविघटनेचाच इतिहास आहे. मेवाड व विजयनगर या दोन सत्तांनी दीर्घकाळपर्यंत मुस्लीम आक्रमणांशी लढा केला व हिंदुधर्म