पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे









हिंदुपदपातशाही



हिंदुपदपातशाही
 राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र व पंजाब (शीख) या ज्या चार राष्ट्रांनी मुस्लीम आक्रमणास तोंड देऊन हिंदुधर्म व हिंदु संस्कृती यांचे रक्षण केले, त्यांपैकी पहिल्या दोघांच्या यशापयशाचा विचार गेल्या प्रकरणात केला. रजपुतांनी सातशे वर्षे अखंड संग्राम करून आरबी आक्रमणास पायबंद घातला. पण तुर्की आक्रमणास पंजाब, अयोध्या, काशी, बंगाल, बिहार, ओरिसा, माळवा, गुजराथ हे प्रदेश बळी पडत असताना त्यांच्या रक्षणाचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. राजस्थान सोडून हिंदुधर्माच्या व स्वराज्याच्या रक्षणासाठी रजपूत बाहेर पडलेच नाहीत. आणि राजस्थानातही सगळे श्रेय मेवाडचे आहे. जयपूर, जोधपूर यांनी फार लवकर पारतंत्र्य स्वीकारले. तेव्हा रजपूत असे म्हणताना मेवाडचा सिसोदे वंशच मनात अभिप्रेत असतो. विजयनगरचे यश यापेक्षा मोठे आहे. त्यांनी तुंगभद्रेच्या दक्षिणेस कर्नाटक, आंध्र, तामीळनाड व केरळ या चार प्रदेशांवर एकछत्री साम्राज्य स्थापून अविरत तीनशे वर्षे संग्राम केला आणि मधून मधून विजापूर, अहंमदनगर, गोवळकोंडा येथील बहामनी राज्यांवर आक्रमण करून त्या सत्ता काही काळ तरी हतबल करून टाकल्या. पण विजयनगरच्या