पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

सोडवाव्या असे हजारो वर्षांच्या या दीर्घ कालावधीत केव्हाच कोणाच्या मनात कसे आले नाही, हा प्रश्न मनाला त्रस्त करून टाकतो आणि त्याचे चिंतन करताना अनेक प्रश्न, अनेक आशंका, अनेक समस्या यांचे मोहोळच्या मोहोळ घोंघावत येऊन बुद्धीला घेरून टाकते. अखिल हिंदूंना एकत्र येऊन करण्याजोगे काही कार्यच नव्हते की काय ? सर्व हिंदूंना समान असे उद्दिष्टच या दीर्घकालात नव्हते काय ? सर्वांच्या सामुदायिक शक्तीने साधावे असे ध्येय हिंदूंच्या डोळ्यांपुढे कधी कोणी उभेच केले नाही काय ? हिंदुसमाजावर व भारतावर इतिहासपूर्वकाळापासून सतत परकीयांची आक्रमणे होत आहेत. गेली हजारो वर्षे तर या आक्रमणांमुळे हिंदुत्व, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा नष्टच होते की काय अशी भीती विचारवंतांच्या चित्तात घर करून राहिली आहे. असे असताना अखिल हिंदुपरिषदेची आवश्यकता हिंदु नेत्यांच्या मनाला का जाणवली नाही किंवा जाणवली असूनही सर्व हिंदु- त्यांतील वर निर्देशिलेले पंथ व त्यांतील सर्व वर्ण, जाती, उपजाती, सवर्णसमाज, अस्पृश्यसमाज- यांना समान व्यासपीठावर येणे शक्य नाही असे वाटल्यामुळे त्यांनी ती अव्यवहार्य म्हणून सोडून दिली असेल काय ? असे अनेक प्रश्न आम्हांला जाब द्या म्हणून समोर उभे राहतात. आणखी एक प्रश्न तर मनाला दंशच करून जातो. सर्व हिंदूंना समान व्यासपीठावर आणणे शक्य नाही असे मागल्या नेत्यांना वाटले असेल की, तसे आणणे निषिद्ध होय, निंद्य होय, ते धर्मविरुद्ध होय असा सिद्धान्त मनाशी असल्यामुळे त्यांनी त्या विचाराला थाराच दिला नसेल- हा तो प्रश्न होय.
 विश्वहिंदुपरिषदेच्या निमित्ताने निर्माण झालेल्या या नैकविध प्रश्नांचा सर्व हिंदूंनी सम्यक् विचार करणे अवश्य आहे. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता आली तर या परिषदेच्या भावी कार्याची दिशा आपल्याला ठरविता येईल, हिंदु समाजाला जडलेल्या व्याधींचा विचार करून काही निदान करता येईल व काही उपाययोजनेचे चिंतन करणे शक्य होईल; त्या दृष्टीने येथे काही प्रयत्न केला आहे.
 या दृष्टीने चिंतन करू लागताच मनापुढे पहिला प्रश्न येतो तो हा की- हिंदुसमाज हा समाज आहे काय ?
 आजच नव्हे तर आज शंभर-दीडशे वर्षे तरी हा प्रश्न पुनः पुन्हा हिंदु विचारवंतांच्या मनाला त्रस्त करीत आहे. कोणत्याही लोकसमूहाला समाज