पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

विनाश टळला असता. किंवा याआधीच आपसातील वैरे विसरून, अभिमान बाजूला ठेवून या सर्व सत्तांनी बहामनी शाह्यांना घेरले असते तर नर्मदेच्या दक्षिणेकडच्या मुस्लीम सत्तेचा समूळ नाश झाला असता. पण हिंदूंची धर्मभावना इतक्या व्यापक प्रमाणावर कधीच संघटना करू शकली नाही. भारताबाहेरच्या मुस्लीमांनाही पाचारण करून, त्यांच्याशी ऐक्य करून भारतातील हिंदुसत्ता नष्ट कराव्या, हे धोरण प्रारंभापासून आजपर्यंत मुस्लीमांनी अनेक वेळा अवलंबिलेले आहे. पण अखिल भारतातल्या नव्हे- केवळ उत्तरेतल्या किंवा केवळ दक्षिणेतल्या हिंदुसत्ता संघटित कराव्या आणि मुस्लीमांविरुद्ध एकसंध फळी उभी करावी हे हिंदूंना कधी साधले नाही. धर्म या संघटना तत्त्वाला इतके श्रेष्ठस्थान त्यांनी कधीही दिले नाही. त्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार व्हावे असा उत्कट आवेश, असा तीव्र ध्येयवाद हिंदुधर्मधुरीण आपल्या समाजात कधीच निर्माण करू शकले नाहीत.
 तालीकोटच्या- राक्षसतागडीच्या लढाईत विजयनगरच्या साम्राज्याचा पाया निखळला हे खरे. पण त्या वेळी त्याचा सर्वनाश झाला हा रूढ समज खरा नाही, हे वर सांगितलेच आहे. त्यानंतर जवळ जवळ पाऊणशे वर्षे हे साम्राज्य बऱ्या स्थितीत टिकून होते. एवढेच नव्हे तर मुस्लीमांच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याचे आपले जन्मप्राप्त कार्यही ते काही अंशी करीत होते. रामराजाचा भाऊ तिरुमल याने १५७० मध्ये आपणास राज्याभिषेक करवून घेतला. त्याला श्रीरंग, राम व वेंकट असे तीन पुत्र होते. पैकी वेंकटाने तीस वर्षे राज्य करून विजयनगरची बरीच प्रतिष्ठा परत मिळविली. त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस म्हैसूर येथे ओडियार या घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले. दोन वर्षांनी १६१४ साली वेंकटचा मृत्यू झाल्यावर वारशाच्या लढाया उद्भवल्या आणि या संधीचा फायदा घेऊन आदिलशहाने कर्नूलचा प्रांत काबीज केला. या साठ-सत्तर वर्षांच्या काळात विजापूर व गोवळकोंडा यांच्या स्वाऱ्या चालूच होत्या. १६४२ च्या सुमारास वरील दोन शाह्यांनी पुन्हा एक होऊन विजयनगरचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले. या वेळी त्यांना दिल्लीपती शहाजहान याचाही पाठिंबा मिळाला. त्याने विजयनगरचे अवशिष्ट साम्राज्य त्या दोघांनी आपसात वाटून घेण्यास मान्यता दिली. अशा रीतीने हिंदुसत्तेचा नाश करण्यास पुन्हा तीन मुस्लीम सत्ता एकत्र झाल्या. या प्रसंगी हिंदूंनी काय केले ? राजा श्रीरंग याने तंजावर,