पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१३५
 

तशा कधीच एक झाल्या नाहीत. त्यामुळे अखेरी यवनांनीच साधली.
 तुंगभद्रेच्या दक्षिणेस विजयनगरचे साम्राज्य दीर्घ काल अबाधित असे होते. पण कृष्णा- तुंगभद्रेच्या दुआबात कोंडविडू येथे रेड्डी आणि राचकोंडा येथे वेलमा या हिंदुसत्ता होत्या. आणि पलीकडे ओरिसामध्ये गजपती यांची हिंदुसत्ता तर पुष्कळच प्रबळ होती. पण हिंदुसत्ता या आपल्या शत्रू आहेत, ही भावना मुस्लीमांत जागृत ठेवण्याचे जसे प्रयत्न होत, तसे प्रयत्न या हिंदुसत्तांनी केव्हाही केले नाहीत. गजपती, रेड्डी व वेलमा यांचे आपसांत नित्य कलह तर चालतच, पण अनेक वेळा त्या सत्ता बहामनी सुलतानांशी सख्य करून त्यांना विजयनगर- विरुद्ध साह्य करीत. मुस्लीमही अनेक वेळा मुस्लीमांविरुद्ध हिंदूंचे साह्य घेत. पण मधुनमधून तरी त्यांचा कडवा हिंदुद्वेष जागृत होऊन ते सर्व मिळून हिंदु- धर्मीयांविरुद्ध उभे ठाकत. बाबर आणि संग यांच्या संग्रामात हेच घडले. आयत्या वेळी संगाकडचे मुस्लीम सरदार त्याला दगा देऊन बाबराला मिळाले. सिंधवरील कासीमच्या आक्रमणाच्या वेळी हेच घडले. मोका बसय्या या हिंदू अधिकाऱ्याने कासीमला सर्वतोपरी साह्य केले. त्याचा भाऊ रासिल यानेही असाच स्वामिद्रोह व धर्मद्रोह केला. पण दाहराकडचा मुसलमान सरदार अलाफी याने मात्र कासीमविरुद्ध लढण्याचे नाकारले. राक्षसतागडीच्या लढाईत याचीच पुनरावृत्ती घडली. अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा हे सुलतान तर एक झालेच. पण शिवाय रामराजाकडच्या मुस्लीम सरदारांनीही त्याला आयत्या वेळी दगा दिला. त्यामुळे ऐन धुमश्चक्रीच्या वेळी विजयनगरच्या सेनेतील दीड लाख फौज उलटली व तिने हिंदू फौजेचा संहार केला. अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेत्र यांच्या सैन्यांत शेकडो रजपूत अधिकारी होते. त्या सेनेचे सेनापतीही अनेक वेळा मानसिंग, जयसिंग हे हिंदु रजपूत होते. पण त्यांनी मुस्लीम स्वामी व मुस्लीम धर्म यांशी असा द्रोह कधीही केला नाही. आयत्या वेळी उलट्न हिंदुराजाला मिळण्याचे व स्वधर्मनिष्ठा प्रगट करण्याचे पातक त्यांनी कधीही केले नाही !
 विजयनगरच्या पाडावासाठी दोन-तीन मुस्लीम सत्ता, काही काळ तरी एक झाल्या; तशा, त्या हिंदुराज्यांच्या संरक्षणासाठी, दक्षिणेतल्या वर सांगितलेल्या हिंदुसत्ता का एक झाल्या नाहीत ? ओरिसाचे गजपती, कोंडविड्डूचे रेड्डी व राचकोंडाचे वेलमा हे या वेळी विजयनगरला मिळाले असते तर या हिंदुसत्तेचा