पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

मान प्रत्येक स्वारीत करीत असत. महंमद कासीम, महंमद गझनी, महंमद घोरी, ऐबक, अल्तमश, काफूर, तघलख यांच्या स्वाऱ्यांचे हे स्वरूप ठरलेलेच होते. पण याची पराकाष्ठेची चीड येऊन त्याचा बदला घेण्यासाठी व मुस्लीम सत्तेचे निर्मूलन करण्यासाठी भिन्न रजपूत राज्यांनी कधी अवश्य ते ऐक्य केले नाही. बहामनी सुलतानांनी या वेळी ते घडविले हाच मुस्लीम व हिंदू यांतील फरक. आधीच्या चाळीस पन्नास वर्षात विजापूर, गोवळकोंडा व अहमदनगर या शाह्यांत अगदी हाडवैर माजून राहिले होते. त्यामुळे कृष्णदेवराय व रामराजा यांनी त्यांच्यावर अनेकदा आक्रमणे करून त्यांना झोडपून झोडपून हैराण करून टाकले होते. आणि या शेवटच्या निजामशाहीवरील स्वारीने तर बहामनी सत्ता नष्ट होण्याचाच समय प्राप्त झाला होता. पण त्यामुळेच त्यांच्यांतील विवेक जागृत झाला. ही विजयनगरची सत्ता अशीच वाढू दिली तर दक्षिण निर्यवन होईल हे भवितव्य त्यांना दिसू लागले व त्यांनी आपसातील वैरे विसरून, एकमेकांशी सोयरसंबंध जोडून, विजयनगरविरुद्ध एक बलाढ्य फळी उभारली व त्या साम्राज्यावर चाल करून राक्षसतागडी येथे रामराजाच्या सैन्याचा संपूर्ण विध्वंस करून त्या साम्राज्याला कायमचे विकलांग करून टाकले.
 कोणत्याही समाजाच्या जीवनशक्तीची हीच कसोटी आहे. कोठले तरी संघटनतत्त्व त्याने अवलंबिले पाहिजे आणि त्या निष्ठेपुढे इतर सर्व निष्ठा, सर्व अभिमान, सर्व मानापमान, सर्व वैमनस्ये, सर्व भेदभाव गौण लेखण्याची शिकवण मनाला दिली पाहिजे. ज्या समाजाला, ज्या प्रमाणात, हे साधते त्या प्रमाणात तो समाज जगण्यात, स्वातंत्र्य टिकविण्यात व आपल्या मानबिंदूचे रक्षण करण्यात यशस्वी होतो. राजस्थानातील जयपूर, जोधपूर, बुंदी, कोटा, अजमीर येथील हिंदुराजांनी अशी संघटनातत्त्वनिष्ठा कधीही दाखविली नाही. त्यामुळे राजस्थानचे एकछत्र कधीही झाले नाही. विजयनगरने धर्मतत्त्वावर संघटन करण्यात दीर्घकाल यश मिळविले. त्यामुळे हिंदुसंस्कृतीचे रक्षण करण्यात त्या साम्राज्याला अपूर्व यश मिळाले. पण तालिकोटनंतर दक्षिणेतल्या लोकांची ही निष्ठा ढळली. या घोर संग्रामाने विजयनगरचा पाया हादरला हे खरे. पण त्याचा संपूर्ण नाश झाला नव्हता. पुढे पाऊणशे वर्षे ते साम्राज्य बऱ्या स्थितीत टिकून होते. पण बहामनी मुस्लीम सत्ता त्या वेळी एक झाल्या तशा फिरून अनेक वेळा होऊन त्यांनी या हिंदुसत्तेचा संपूर्ण नाश केला. तरी दक्षिणेतल्या हिंदुसत्ता मात्र