पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१३३
 

फार मोठ्या प्रमाणावर ते नित्य खरेदी करीत. लष्करी शिक्षणासाठी त्यांनी शाळाही स्थापन केल्या होत्या. कारण त्यांनी ओळखले होते की मुस्लीम आक्रमण हे प्रामुख्याने लष्करी आक्रमण होते. लूटमार, दरोडेखोरी, कपटनीती, जाळपोळ, कत्तल हेच त्यांचे मुख्य बळ होते. अशा आक्रमणाला त्याच भाषेत उत्तर दिल्याखेरीज हिंदूंचा निभाव लागणार नाही हे पक्के जाणून त्यांनी त्याच राजनीतीचा निःशंकपणे अवलंब केला होता. रजपुतांनी हे फारसे जाणले नाही. खरे म्हणजे मुस्लीम आक्रमणाचे खरे स्वरूप रजपुतांना कधी आकळलेच नाही. अंध, पिसाट धर्मश्रद्धा व लूटमारीची विद्या हे ज्यांचे बळ अशा जमातीशी उदार, उदात्त तत्त्वाने वागण्यात आत्मघात आहे, हा उमज त्यांना पडलाच नाही. म्हणून स्त्रियांचा जोहार व पुरुषांचे हौतात्म्य हेच त्यांनी भूषण मानिले, पण त्याचे फल काय ? तर स्त्रिया मोगलांच्या जनानखान्यात गेल्या व पुरुष त्यांचे दास झाले. विजयनगरच्या सम्राटांनी रजपुताचे अविवेकी, आत्मघातकी उदार धोरण, त्यांची ती सात्त्विक राजनीती व ते निष्फळ, विचारहीन हौतात्म्य यांचा कधीच अवलंब केला नाही. त्यांनी नित्य चाणक्यनीतीचाच आश्रय केला. त्यामुळेच दक्षिण हिंदुस्थान मुस्लीमवर्चस्वापासून अबाधित राखण्यात ते यशस्वी झाले. या सर्वच दृष्टींनी सम्राट कृष्णदेवराय यांची कारकीर्द अत्यत वैभवशाली झाली.
 कृष्णदेवरायानंतर अच्युतराय व सदाशिवराय हे दोन अगदी नाकर्ते राजे झाले. सदाशिवरायाच्या कारकीर्दीतच सर्व सत्ता रामराजाच्या हाती गेली. हा राजा अतिशय कर्ता आणि पराक्रमी असून बहामनी राज्याच्या भिन्न शाखांवर आक्रमण करून त्यांना खच्ची करून टाकण्याचे विजयनगरचे कार्य त्याने अखंड चालू ठेविले होते. त्यांचेही आपापसांत नित्य झगडे व लढाया चालू असत व ते सुलतान एकमेकांविरुद्ध रामराजाची मदत नेहमी घेत असत. १५५७ साली आदिलशहा व कुतुबशहा यांनी राजारामाच्या मदतीने अहमदनगरच्या निजामशाहीवर हल्ला केला व ते राज्य अगदी बेचिराख करून टाकले. त्या वेळी, फिरिस्ता या इतिहासकाराच्या म्हणण्याप्रमाणे, रामराजाच्या हिंदू लष्कराने अनेक मशिदी उध्वस्त केल्या, मुस्लीम स्त्रियांची विटंबना केली व कुराणाचाही अवमान केला. आणि यांतूनच राक्षसतागडीचा संग्राम उद्भवून विजयनगरच्या साम्राज्याला प्राणांतिक तडाखा बसला. वास्तविक हिंदूंवर असे अत्याचार मुसल-