पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

याची कोणी चौकशीही करीत नसे. सर्वत्र सहिष्णुता व समता यांचे अधिराज्य होते.- (विजयनगर एंपायर, फादर हेरास व व्ही. के. भांडारकर; विजय. कमोव्हॉ, पृ. ३४).
 विजयनगरच्या सम्राटांनी विद्येप्रमाणेच लष्करी यंत्रणाही अत्यंत कार्यक्षम ठेवण्याची दक्षता बाळगिली होती. म्हणूनच त्यांना राजर्षी ही पदवी शोभते. हरिहर व बुक्क यांच्या संगनवंशात १४८५ च्या सुमारास अत्यंत भ्याड, दुबळे व व्यसनी वारस निर्माण झाले. तेव्हा सालुव नरसिंह या सेनापतीने त्यांना बाजूस सारून स्वतः सत्तारोहण केले. इतिहासकार याबद्दल त्यांना मुळीच दोष देत नाहीत. त्यांनी हे हिंदुधर्माच्या रक्षणासाठीच केले, असे म्हणून ते या कृत्याचे- या अपहाराचे- समर्थनच करतात. या सालुव नरसिंहाने राज्यातील शांतताप्रिय, भाविक शेतकऱ्यांना क्षात्रधर्माची दीक्षा देऊन मुस्लीमांशी तितक्याच वीरश्रीने लढण्यास शिकविले. ही या राजांची फार मोठी समयज्ञता होय. त्यांनी हे जाणले की मुसलमानांत प्रत्येक मुसलमान युद्धोन्मुख असतो. आणि धर्मांधतेने तो पिसाट झाल्यामुळे त्याचा त्वेष दुपटीने वाढलेला असतो. उलट हिंदू हा शांत, निष्पाप, सहिष्णु व म्हणून मंद व दुबळा झालेला असतो. हे जाणूनच त्यांनी सर्व जनतेला- शेतकऱ्यांनासुद्धा- युद्धप्रवण करून त्यांच्या ठायी मर्दानी बाणा रुजविला. सालुवाप्रमाणे वीर नरसिंहानेही हेच धोरण ठेविले होते. प्रजेत लप्करी बाणा चेतविण्यासाठी त्याने हरतऱ्हेचे प्रयत्न केले. जातिभेदनिरपेक्ष सैन्यात सर्वांची भरती केली आणि भ्याडपणा ही सर्वात लज्जास्पद गोष्ट ठरवून मरणमारणाच्या संग्रामास त्यांना तयार केले. या चैतन्य प्रेरणेमुळेच सर्व जनता विजयनगरच्या ध्वजाखाली गोळा होऊन मुस्लीमांशी लढण्यास सिद्ध झाली.- (डॉ. सुनशी, खंड ६ वा, पृ. ३०२, ३०८)
 कृष्णदेवरायांच्या कारकीर्दीत विजयनगरच्या वैभवाचा कळस झाला. (१५०९- १५३०.) हे सम्राट महापराक्रमी असून विद्या, कला, शास्त्रे यांचे भोक्ते होते. कृष्णा व तुंगभद्रा या दुआबातील प्रदेश तर त्यांनी आपल्या अधिराज्याखाली आणलाच पण अनेक वेळा विजापूर, गुलबर्गा या बहामनी राजधान्यांवर आक्रमण करून त्यांनी त्या मुस्लीम सत्ता खिळखिळ्या करून टाकल्या. लष्करी यंत्र अत्यंत सुसज्ज व कार्यक्षम ठेवण्याची त्यांनी अखंड दक्षता बाळगली होती. अरब व्यापाऱ्यांकडून अस्सल पैदाशीचे घोडे व कारीगर हत्यारे यांची