पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१३१
 

समाजाला अपकर्षकारक आहेत असे सांगण्याचे धैर्य त्यांनी दाखविले, त्यामुळेच मोठे धर्मपरिवर्तन होऊन विजयनगर साम्राज्याचा पाया दृढ झाला. त्यांनी हरिहर व बुक्क यांना स्वधर्मात परत घेतले नसते आणि स्वराज्य व स्वधर्म यांचे अद्वैत समाजमनावर बिंबवून निवृत्तिवादाची जळमटे झाडून टाकली नसती तर ते कदापि शक्य झाले नसते.

राजर्षी बुक्क :
 विद्यारण्यासारखा द्रष्टा सर्वज्ञ पुरुष या काळात हिंदूंना गुरू म्हणून लाभला हे जसे भाग्य तसेच हरिहर आणि बुक्क हे धर्मवेत्ते राजपुरुष विजयनगरला संस्थापक म्हणून लाभले हेही भाग्यच होय. सम्राट बुक्क हे तर राजर्षीच होते. त्यांनी राजपदावर येताच अखिल वेदविद्येचा संग्रह व संशोधन करण्याचे ठरवून त्यासाठी विद्यारण्यांच्या नेतृत्वाखाली एक पीठच स्थापन केले आणि देशातील सर्व विद्वान पंडितांना त्या पीठात एकत्र जमवून वेदग्रंथांवर नवी भाष्ये लिहिण्याचा आदेश दिला. दुसरेही एक महत्त्वाचे कार्य राजर्षी बुक्क यांनी केले. ते म्हणजे शैव, वैष्णव, जैन या ग्रंथांतील वैमनस्य नष्ट करून हिंदुधर्मातील विघटक वृत्तींना आळा घातला हे होय. याच्या आधीच्या काळात हे पंथभेद किती विकोपाला गेले होते, ज्या पुराणांनी सर्व देवतांचे ऐक्य प्रतिपादिले होते त्यांनीच पुढे त्यांत कसे भेद माजविले होते, हे मागल्या प्रकरणाच्या अखेरीस दाखविलेच आहे. या भेदामुळे हिंदुधर्माचे ऐक्य अगदी भंगले होते. पण सम्राट बुक्क यांनी या दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून धर्माला पुन्हा संघटित रूप दिले. जैन व वैष्णव यांच्यांत कलह उद्भवला तेव्हा बुक्क यांनी घोषणा केली की, 'जैनदर्शन व वैष्णवदर्शन यांत काहीही भेद नाही. वैष्णवांकडून जैनांना काही लाभहानी झाली तर ती वैष्णवांचीच लाभहानी आहे असे वैष्णवांनी मानावे. आणि जैनांनीही खात्री बाळगावी की त्यांचे रक्षण करण्याचे व्रत वैष्णव यावच्चंद्र दिवाकरौ पाळतील.' (एपिग्राफिका कर्नाटिका II. १३६, शिलालेख १३६८ इ.) परकी प्रवाशांनीही विजयनगर सम्राटांच्या सहिष्णु वृत्तीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. बार्बोसा म्हणतो, 'सम्राटांनी सर्वांना इतके स्वातंत्र्य दिलेले होते की, कोणीही वाटेल तेथे मुक्तसंचार करीत असे व आपल्या मताप्रमाणे उपासना करीत असे. अमका मनुष्य ख्रिश्चन आहे की ज्यू की मुस्लीम का अन्य कोणी