पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

त्यांच्या युक्तायुक्ततेचा विचार न करता, परिस्थितीचा विचार न करता, त्यांप्रमाणे आचरण करणे हेच श्रेयस्कर होय, असे मत मीमांसापंथाने मांडले. मीमांसा पंथाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता कुमारिल भट्ट हा सातव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. तेव्हापासून त्याच्या वेदप्रामाण्याची व अदृष्टप्रधान धर्माची मगरमिठी हळूहळू हिंदुसमाजाच्या मानेला बसत गेली व पुढे त्या तत्त्वांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत जाऊन हिंदुसमाज अंध व मूढ झाला. आपले आचरण योग्य की अयोग्य हे पारखून घेण्याची त्याची दृष्टीच नाहीशी झाली. असा समाज विघटित होऊन परकी आक्रमणास बळी न पडला तरच नवल ! माधवाचार्यांनी आपल्या वेदभाष्यात बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार केला आहे. आणि स्वतः विचार करून धर्मनिर्णय करण्याचे महत्त्व सांगितले आहे. [या ग्रंथातील ४ थ्या प्रकरणात प्राचीन काळी देशकालपरिस्थिती पाहून धर्मनिर्णय करण्याची पद्धती कशी होती ते दाखविलेच आहे. ज्यांना अधिक जिज्ञासा आहे त्यांनी तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांचा 'धर्मस्वरूप निर्णय' हा बहुमोल ग्रंथ पहावा. प्रकरण १२ व १३. माधवाचार्याचे मत- पृ. २५५.] माधवाचार्यांनी मीमांसकांची समन्वयपद्धतीही वेदप्रामाण्याप्रमाणेच त्याज्य ठरविली आहे. मीमांसकांचा असा एक विपरीत सिद्धान्त आहे की सर्व स्मृतींचा अर्थ एकच आहे ! त्यांच्यात कोणत्याही प्रश्नाविषयी मतभेद नाही. वरवर दिसायला मतभेद दिसतात. पण तो भ्रम होय. म्हणून टीकाकारांनी अगदी परस्परविरोधी वचनांचाही समन्वय करून दाखविला पाहिजे. म्हणजे भिन्न स्मृतींतील वचनांचा एकच अर्थ लावला पाहिजे. मीमांसकांची ही समन्वयपद्धती म्हणजे शुद्ध रानटीपणा आहे. हजारो वर्षांवर विखुरलेल्या, भिन्न प्रांतांतील, भिन्न स्मृतिकारांचे प्रत्येक सामाजिक व धार्मिक प्रश्नाविषयी तंतोतंत एकच मत असेल, असे मानणे म्हणजे मानवी बुद्धीचे दिवाळे जाहीर करण्यासारखेच आहे. पण उत्तरकालीन हिंदुधर्मशास्त्रकारांनी ती पद्धत स्वीकारून तसे दिवाळे जाहीर केले म्हणूनच या समाजाचा नाश झाला. माधवाचार्यांनी 'ही पद्धत कपोलकल्पित आहे, निर्मूल आहे व तिचे प्रवर्तन करणारे मन्दमती आहेत' असे म्हणून, 'आम्ही तिचा स्वीकार करणार नाही' असे स्पष्ट म्हटले आहे. (उक्तग्रंथ पृ. १८४-५) वेदप्रामाण्य, अदृष्टप्रधान धर्म व समन्वयपद्धती या अत्यंत घातक तत्वांचा निषेध करून माधवाचार्यांनी ती त्याज्य ठरविली ही त्यांची फार मोठी सेवा होय. ही तत्त्वे