पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१२९
 

असले पाहिजे अशी हिंदुमात्राची आकांक्षा होती. स्वधर्म व स्वराज्य यांच्या अभेदाविषयीच्या अशाच कल्पनांनी शिवाजी व त्याचे अनुयायी प्रेरित झाले होते व मराठी साम्राज्याच्या उभारणीमागे हीच प्रेरणा होती असे आपणांस दिसते.'- (हिंदुइझम् अंडर विजयनगर किंग्ज, पृ. ३९)
 याच ग्रंथातील 'विजयनगरच्या इतिहासातील एक महत्त्वाचे प्रकरण' या आपल्या लेखात वेंकटेशम पंतलु यांनीही विजयनगरच्या यशाची अशीच मीमांसा केली आहे. ते म्हणतात, 'विजयनगरच्या साम्राज्याचा उदय व ऱ्हास या योगायोगाच्या गोष्टी नाहीत. मुस्लीम आक्रमणामुळे हिंदूंचे स्वातंत्र्यच नव्हे तर धर्म व एकंदर संस्कृती यांचाही उच्छेद होण्याची वेळ आली होती. अशा वेळी विद्यारण्यस्वामींचा उदय झाला. त्यांनी येथील अध्यात्मविद्या व राजविद्या यांचे पुनरुज्जीवन केले. यासाठी त्यांनी शृंगेरीच्या मठात नवजीवन निर्माण करून कर्नाटकात एकंदर आठ पीठांची स्थापना केली. यांचाच दक्षिणेतील राज्यांना दीपस्तंभासारखा उपयोग झाला. स्वामींनी स्वतः पंपा (हंपी) येथे विरूपाक्ष पीठ स्थापन करून हरिहर व बुक्क यांना साम्राज्यस्थापनेच्या कार्यात तेथूनच सर्व साह्य केले.' -(उक्तग्रंथ, पृ. २७२)

बुद्धिप्रामाण्य :
 विद्यारण्य तथा माधवाचार्य यांनी घडविलेल्या धार्मिक क्रान्तीचे स्वरूप आता काहीसे स्पष्ट होईल असे वाटते. शुद्धिबंदीची अत्यंत घातक रूढी त्यांनी नष्ट केली; आणि स्वधर्माला इहाभिमुख बनवून शृंगेरीच्या पीठाकडूनच जनतेच्या मनावरील निवृत्तिवादाचे, राजकीय उदासीनतेचे कश्मल झाडून टाकले. हे सर्व त्यांना करता आले, करण्याचे धैर्य झाले याचे कारण म्हणजे देशकाल- परिस्थिती पाहूनच धर्मनिर्णय करणे अवश्य असते असा त्यांचा बुद्धिनिश्चय झाला होता हे होय. यापूर्वीच्या काळात मीमांसादर्शनाने शब्दप्रामाण्याची म्हणजे वेदप्रामाण्याची घातक कल्पना रूढ करून धर्म हा अदृष्टप्रधान असतो असा सिद्धान्त मांडला होता. धर्माचरणाची फले सर्व परलोकात मिळतात, ती मिळाली की नाही हे ठरविण्याचे सामर्थ्य मानवी बुद्धीला नाही, ती बरी- वाईट फले सर्व अदृष्टच असतात, तेव्हा फलांवरून, परिणामांवरून धर्माज्ञा योग्य की अयोग्य हे सांगणे अशक्यच आहे; म्हणून वेदाज्ञा शिरसावंद्य मानून