पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

विसर्जित कराव्या, शिष्याने गुरुभक्तीत लोपावे, ही शिकवण हिंदुधर्म देतो. पण हे सर्व परमार्थात ! ऐहिक उन्नतीसाठी, समाजाच्या दृढीकरणासाठी, संघटनेसाठी हे आत्मविसर्जन उपदेशावे याची चिंता हिंदुधर्मशास्त्रज्ञांनी कधी केली नाही.

राजधर्माचे पुनरुज्जीवन :
 महाभारताने हे तत्त्वज्ञान प्रसारिले होते. त्यानंतर अनेक शतके त्याचा लोप झाला होता. माधवाचार्यांनी आता त्याचे पुनरुज्जीवन करावयाचे ठरविले. आणि महाभारताच्याच भाषेत बोलावयाचे म्हणजे ब्रह्म व क्षत्र यांचा संयोग घडवून आणला. त्यांचे गुरू शृंगेरीचे शंकराचार्य, विद्यातीर्थ (यांचे नाव विद्याशंकर असेही दिले आहे.) यांनी दक्षिणेत आठ पीठे स्थापन करून प्रत्येक ठिकाणी एका थोर संन्याशाची नियुक्ती केली. विद्यारण्य या सर्वाचे प्रमुख होते. (विद्यारण्य, माधव व सायण हे सर्व एक की भिन्न हा प्रश्न वादग्रस्त आहे. विद्यारण्य व माधव एकच आणि सायण त्यांचे बंधू असेही कोणी मानतात.) हरिहर आणि बुक्क यांना स्वधर्मात घेतल्यानंतर त्यांनी त्या पीठांच्या द्वारे स्वधर्मरक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली पाहिजे हा संदेश तुंगभद्रेच्या दक्षिणेस रामेश्वरापर्यंत जनतेत प्रसृत करण्याची व्यवस्था केली आणि सर्व जनशक्ती त्यांच्या मागे उभी केली. विद्यारण्य स्वतः या साम्राज्याचे मंत्रीही झाले. स्वराज्य व स्वधर्म यांचा असा संयोग झाल्यामुळेच, पूर्वी इतरांना जे यश आले नाही, ते विजयनगरच्या धुरीणांना अल्पावधीत प्राप्त झाले. (विद्यारण्यांच्या कार्याची माहिती- विजयनगर कमेमोरेशन व्हॉल्यूम- या ग्रंथात एस्. श्रीकांतय यांनी आपल्या लेखात दिली आहे. पृ. १६१ ते १६८.) ए. रामराव, असि. डायरेक्टर ऑफ आर्किऑलजी, म्हैसूर, यांनीही वरील ग्रंथातील आपल्या लेखात हेच मत मांडले आहे. ते म्हणतात, 'मुस्लीमांच्या आक्रमणापासून हिंदुधर्माचे रक्षण व्हावे ही तीव्र इच्छा दक्षिणेतील हिंदूंच्या सर्व जातींत निर्माण झाली होती. आणि तिच्यातूनच विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. त्या वेळी स्वराज्य हाच स्वधर्मरक्षणाचा उपाय होय ही सर्वांची निश्चिती झाली होती. हे स्वराज्य विघटक शक्तींचा नाश करून आक्रमणास तोंड देण्यास आणि त्याचबरोबर या भूमीतील धार्मिक, सामाजिक, विद्याविषयक व आर्थिक अशा सर्व परंपरांचे व संस्थांचे रक्षण करण्यास समर्थ