पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१२७
 

करणार आहेत. आणि हरिहर त्याचे प्रतिनिधी म्हणून कारभार पाहणार आहेत. प्रारंभी राजमुद्राही देवाच्या नावाचीच करण्यात आली आणि अशारीतीने लोकांचा विरोध वितळविण्यात आला.

व्यक्तिगत व राष्ट्रीय आकांक्षा :
 अनागोंदीस हरिहराने राज्य स्थापन केले आणि विजयनगर या राजधानीचा पायाही घातला. अर्थात त्याला सुखाने कोणीच राज्य करू देणार नव्हते. दिल्लीचे सुलतान हे तर त्याचे शत्रू होतेच, पण कापय नायक व होयसळ राजा वीर बल्लाळ या हिंदूंनीही परिस्थिती ओळखून त्याच्याशी सहकार्य करावयाचे, ते न करता त्याच्याशी शत्रुभावच धरला. कारण त्यांनाही सम्राटपदाची महत्त्वाकांक्षा होती. त्या मागल्या काळात हिंदुराजनीतिशास्त्राने घटनात्मक अशी कोणतीच राज्यव्यवस्था निर्माण केलेली नव्हती. किंबहुना ब्रिटिश येथे येईपर्यंत घटनाबद्ध संस्था अशी भारतात नव्हतीच. त्यामुळे समाजाचे सर्व भवितव्य व्यक्तीवर अवलंबून असे आणि धर्म हे संघटनतत्त्व नसल्यामुळे साम्राज्याकांक्षा असलेल्या दोन हिंदू पराक्रमी पुरुषांनी आपसात लढून निर्णय करण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. वीर बल्लाळ व हरिहर यांची प्रत्यक्ष लढाई झाली नाही. पण महंमद तघलखाने मदुरेस स्थापन केलेल्या मुस्लीम राज्याचा सुभेदार जलालुद्दिन यांशी बल्लाळाने एकट्याने लढा द्यावयाचे ठरविले. आणि त्याने तहाच्या वाटाघाटीच्या मिषाने त्यास बोलावून तेथे दग्याने ठार मारले. अशा रीतीने बल्लाळाला सम्राटपद तर नाहीच मिळाले, तर हिंदूंची एक मोठी शक्ती मात्र वाया गेली. आणि मदुरेची मुस्लीम सत्ता नष्ट करण्यास विजयनगरला दीर्घकाळ लागला. हरिहरानंतर बुक्क गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत १३७० साली त्याचा मुलगा कंपन याने मदुरेवर स्वारी करून सुलतानास ठार मारले. वीर बल्लाळाने काळ जाणला असता, हरिहराशी सहकार्य केले असते, तर हे कार्य २८ वर्षांपूर्वीच झाले असते. तेवढ्या अवधीत मदुरेच्या सुलतानाने अनेक मंदिरे फोडली होती, स्त्रियांवर आत्याचार केले होते, आणि हजारो लोकांची कत्तल केली होती. मदुरा म्हणजे केवळ नरक झाला होता. व्यक्तिगत आकांक्षा जोपर्यंत समष्टीच्या आकांक्षात विलीन करण्यास हिंदू शिकत नाहीत तोपर्यंत त्यांचा हा नरकवास चुकावयाचा नाही. आत्मा परमात्म्यात विलीन करावा, भक्ताने ईश्वरेच्छेत आपल्या इच्छा