पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







हिंदुसमाज समाज आहे काय ?



विश्वहिंदुपरिषद
 जानेवारी १९६६ मध्ये गंगा-यमुनांच्या संगमावर प्रयागक्षेत्री विश्वहिंदुपरिषद् भरली होती. जगातल्याच नव्हे तर भारतातल्या हिंदूंची अशी परिषद् प्राचीन अर्वाचीन काळी केव्हाही भरली नव्हती. त्या दृष्टीने पाहता हिंदूंच्या जीवनातील ही अत्यंत महत्त्वाची घटना होय असे म्हणावे लागेल. येथे हिंदू हा शब्द वैदिक, बौद्ध, जैन, शीख, लिंगायत या सर्व पंथांचा समावेश करणारा समाज या अर्थी योजिलेला आहे. बौद्धपंथीयांच्या काही परिषदा- संगीतिका- दोन-एक हजार वर्षांपूर्वी भरलेल्या आहेत. हिंदूंच्या विद्वत्परिषदाही मागे भरत व अजूनही भरतात. पण अखिल हिंदूंची अशी ही पहिलीच परिषद आहे. तेव्हा तिचे काही अनन्यसामान्य महत्त्व आहे हे कोणाच्याही ध्यानी येईल.
 या परिषदेची वार्ता कानी येताच अशी परिषद पूर्वी केव्हाच का भरली नव्हती असा प्रश्न कोणाही विचारी माणसाच्या मनात उभा राहील. माझ्याही मनात तसाच तो उभा राहिला. 'कोणाही हिंदू- नेत्याच्या मनात तशी परिषद् भरविण्याची कल्पना आली नाही म्हणून'- असे त्या प्रश्नाचे साधे उत्तर देता येईल. पण असे का झाले, अखिल हिंदूंना एकत्र आणावे, त्यांची संघटना करावी, त्यांच्यांत सामरस्य निर्माण करावे, त्यांच्या समस्या सामुदायिकरीत्या