पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

सुलतानाने नंतर कांपिली राज्याच्या बंदोबस्तासाठी आपले सेनापती- सुभेदार म्हणून परत पाठविले. हे दोघे वरंगळचे सरदार होते असे कोणी म्हणतात. पण इस्लामचा स्वीकार करून ते सुलतानाचे सुभेदार म्हणून परत दक्षिणेत आले होते याविषयी फारसा वाद नाही. (डॉ. मुनशी, उक्तग्रंथ, पृ. ६२, ७७, २७१) धर्मांतर झाले तरी हरिहर व बुक्क यांना इस्लामविषयी मुळीच प्रेम नव्हते. त्यांच्या अंतःकरणात हिंदू धर्माविषयी अजून दृढ भक्ती होती. पण तरीही त्यांना विद्यारण्यासारखा स्वतंत्र प्रज्ञेचा धर्मवेत्ता पुरुष भेटला नसता तर त्यांचा नाइलाज होऊन इतर अनेक धर्मांतरित पराक्रमी पुरुषांप्रमाणे त्यांनी कांपिलीस किंवा अन्यत्र आपल्या मुस्लीमवंशाची गादी स्थापिली असती. पण सुदैवाने त्यांना विद्यारण्य भेटले. त्यांनी त्यांना स्वधर्मात परत येण्याचा उपदेश केला आणि शुद्धीची जबाबदारी स्वतःच्या शिरी घेऊन, त्यांचे गुरू शृंगेरीपीठाचे शंकराचार्य विद्यातीर्थ याची संमतीही मिळविली. राजसत्तेप्रमाणेच धर्मसत्तेचे आहे. तिच्या पीठावर अधूनमधून जरी एखादा प्रज्ञावंत पुरुष आला तरी तो समाजाच्या प्रगतीला अत्यंत वेगाने चालना देतो. आद्य शंकराचार्यांनंतर विद्यातीर्थांपर्यंत अनेक शंकराचार्य त्या गादीवर आले असतील, पण त्यांत द्रष्टा असा कोणीच नव्हता. नाही तर आपल्या कालभेदी दृष्टीने इस्लामी आक्रमणाचे स्वरूप जाणून त्याने आधीच उठावणी केली असती. पण तसे घडले नाही. उत्तर हिंदुस्थानातील अनर्थ दक्षिणेत कोणी आकळलाच नाही. सुदैव एवढेच की तो अनर्थ दक्षिणेत कोसळल्याबरोबर त्याचे स्वरूप जाणून त्याच्या प्रतिकारासाठी फार मोठे धर्मपरिवर्तन घडविणे अवश्य आहे हे जाणून ते घडविण्यास उद्युक्त होणारे विद्यारण्य- विद्यातीर्थ यांसारखे थोर पुरुष येथे निर्माण झाले. ते न होते तर हरिहर व बुक्क स्वधर्मात परत आले नसते. आणि मग हिंदुधर्माच्या पुनरुत्थानाची आशा कितपत धरता आली असती याचा प्रत्येकाने स्वतःशीच विचार करावा. विजयनगरच्या साम्राज्याची स्थापनाच असंभवनीय झाली असती. आणि मग मराठ्यांचा उदय होण्याचा काल येईपर्यंत सर्व हिंदुस्थान इस्लाममय झाला असता. पण विद्यारण्यांनी मोठे धैर्य दाखवून त्या बंधूंचे परिवर्तन केले म्हणून ते अशुभ टळले. त्या वेळी जनतेच्या मनावर रूढ अंध धर्मशास्त्राचेच संस्कार होते. त्यामुळे लोकांचा शुद्धीला विरोध होता. पण विद्यारण्यांनी जरा चतुराई लढवून असे जाहीर केले की, हरिहर स्वतः राजा न होता साक्षात भगवान विरूपाक्षच राज्य