पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१२५
 

आक्रमणाचा जो थोडा इतिहास वर दिला आहे, त्यावरून कोणाच्याही ध्यानात येईल, आणि मग विजयनगर, मराठे व शीख यांच्या यशाचे स्वरूप पाहता त्यांच्या धुरीणांनी धर्मशास्त्रात काही अंशी तरी क्रान्ती केली असली पाहिजे, त्यावाचून त्यांना यश मिळणे सर्वथा असंभवनीय होते, असा विचार मनात येऊन त्या धर्मक्रान्तीचे स्वरूप काय हे जाणून घेण्यास मन उत्सुक होईल. विजयनगरच्या धुरीणांनी धर्मक्रान्ती केली होती हे अगदी निर्विवाद होय. यादव, होयसळ, पांड्य व काकतीय यांना मुळीच यश आले नाही आणि विजयनगरला एक प्रचंड साम्राज्य स्थापून अडीच-तीनशे वर्षे यशस्वी प्रतिकार करून तुंगभद्रेच्या खालच्या प्रदेशात हिंदुधर्म व हिंदू संस्कृती यांचे रक्षण करता आले याचे श्रेय त्या धर्मक्रान्तीलाच आहे हे आता सर्वमान्य झाले आहे.

विजयनगर- धर्मक्रान्ती :
 धर्मक्रान्तीवाचून समाज उत्कर्ष होणार नाही अशी विजयनगरच्या धर्मधुरीणांच्या बुद्धीची निश्चिती झाली होती याचे पहिले गमक म्हणजे त्यांनी पतितशुद्धीच्या रूढीचे केलेले पुनरुज्जीवन हे होय. देवलस्मृतीने, मुस्लीमांनी सक्तीने ज्यांचे धर्मांतर केले त्यांची शुद्धी करावी, असे शास्त्र आठव्या शतकात सांगितले होते. पण नंतरच्या काळात, कलिवर्ज्याचा कर्ता आणि इतर स्मृतिकार व निबंधकार या अंध, मृढ व अविवेकी धर्मशास्त्रज्ञांनी देवलांचे ते शास्त्र त्याज्य ठरविले होते. पण विद्यारण्य तथा माधवाचार्य हे जे चौदाव्या शतकातील धर्मद्रष्टे थोर पुरुष यांना शुद्धिबंदी किती घातक आहे हे ध्यानात येऊन त्यांनी हरिहर आणि बुक्क या इस्लामला सक्तीने बळी पडलेल्या थोर सरदारांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेतले.

विद्यारण्य :
 कांपिली हे त्या काळी एक स्वतंत्र राज्य होते. धारवाड, बेल्लारी, रायचूर हे परगणे त्यात समाविष्ट होते. त्या राज्यावर मुस्लीमांची धाड आली त्या वेळी तेथील राजा कांपिलीदेव रणांगणी पडला. त्याच्या सर्व पुत्रांना व सरदारांना महंमद तघलख याने कैद करून सक्तीने बाटविले. हरिहर आणि बुक्क हे विजयनगरचे संस्थापक हे कांपिलीदेवाचेच सरदार होते. त्यांना दिल्लीला नेऊन