पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

शहाणपण कसले ते त्याला मुळीच नव्हते. त्यामुळे मुस्लीम आक्रमणाचे स्वरूप त्याला कळले तरी नसावे किंवा कळूनही तो बेसावध राहिला असावा.' -(हिस्टरी ॲण्ड कल्चर ऑफ इंडियन पीपल; संपादक : डॉ. मुनशी.- खंड ६ वा, पृ. ५३)

अधोगामी धर्म :
 १२९४ पासून १३३६ पर्यंत म्हणजे विजयनगरची स्थापना होईपर्यंत सतत चाळीस वर्षे दिल्लीचे सुलतान दक्षिणेवर स्वाऱ्या करीत होते. त्यात त्यांचा एकदाही पराभव झाला नाही. एकाद्-दुसऱ्या स्वारीतील जयापजय हा योगायोग मानता येईल. पण या चाळीस वर्षांत त्यांच्या वीस तरी स्वाऱ्या झाल्या असतील. शिवाय हिंदूंची भिन्न राज्ये होती. यादव, होयसळ, पांड्य व काकतीय असे चार हिंदू राजवंश होते. पण एकही या मुस्लीम आक्रमणाचा प्रतिकार करू शकला नाही. दोन स्वाऱ्यांमध्ये कधी तीन, कधी चार, तर कधी दहा वर्षांचासुद्धा अवधी गेलेला आहे. म्हणजे हिंदूंना उसंतच मिळाली नाही असे नाही. मुसलमान सेनापती एकच एक सतत येत होता आणि तो असामान्य होता, असेही नाही. अल्लाउद्दिन खिलजी, मलिक काफूर, खुश्रूखान, मुबारिक शहा, जौनाखान, महंमद तघलख, जलालुद्दिन असे अनेक मुस्लीम सेनापती या स्वाऱ्या घेऊन येत होते. ते सर्वच्या सर्व हिंदुराज्ये बुडविण्यात यशस्वी व्हावे आणि दोन-दोनशे वर्षे स्थायी झालेल्या सूर्यचंद्रवंशीय हिंदु साम्राज्यांना त्यांचा प्रतिकार करता येऊ नये याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच होतो, हिंदुसमाजात जीवनशक्ती राहिलीच नव्हती. त्यांचा धर्म, म्हणजेच अर्वाचीन भाषेत त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान, अत्यंत विकृत, अत्यंत हीन व अधोगामी झाले होते. हे विकृत तत्त्वज्ञान, हा अधोगामी घातक धर्म कोणता याचे विवरण मागल्या प्रकरणात विस्तरशः केले आहे. या प्रकरणातही प्रारंभी त्याचा सारार्थ सांगितला आहे. जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, तज्जन्य विषमता, अंधरूढीचे प्राबल्य, देश- कालपरिस्थिती पाहून चिंतन करण्याची असमर्थता, धर्माची अपरिवर्तनीयता, त्यातील कर्मकांड, संन्यास, निवृत्ती, परलोकनिष्ठा, शब्दप्रामाण्य, राजधर्माची उपेक्षा, स्वराज्य व स्वधर्म यांची फारकत हीच त्या अधोगामी, हीन, अमंगळ धर्माची लक्षणे होत. अशा या धर्मामुळे हिंदुसमाजाचा नाश झाला हे मुस्लीम