पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१२३
 

फौजफाटा देऊन पाठविले. उत्तरेतून ही काळलाट येत असताना, द्वारसमुद्रावर ती थडकण्याची वेळ आली तरी वीर बल्लाळ राजधानीत नव्हता. तो कोठे गेला होता ? मदुरेच्या पांड्य राज्यावरील हक्काविषयी सुंदर पांड्य व वीर पांड्य हे आपसात झगडत होते. त्यांनाही या वेळी आपण भांडू नये असा विवेक सुचला नाही. आणि वीर बल्लाळालाही, या भांडणाचा फायदा उठविण्याची ही वेळ नव्हे, हे ध्यानात आले नाही. वरून तो काळ चालून येत असताना वीर बल्लाळ पांड्यांवर स्वारी करून त्यांचा मुलूख घशात घालण्याच्या उद्योगात गढून गेला होता. अर्थात तो राजधानीत- द्वारसमुद्रास- परत आला तेव्हा रामचंद्रराव व प्रतापरुद्र यांच्याच मार्गाने जाण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही हे ध्यानी येऊन त्याने शरणागती पत्करली. त्यानंतर पांड्यांची घटका भरली. त्यांनी गनिमी काव्याने दऱ्याखोऱ्यातून बराच तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे काफूरच्या सैन्याची बरीच दुर्दशाही झाली. पण अंती विजय त्याचाच झाला. त्याने देवगिरी, वरंगळ, द्वारसमुद्र यांच्या प्रमाणेच पांड्यांची राजधानी मदुरा जाळून टाकली आणि तेथून थेट रामेश्वरला जाऊन तेथे त्याने मशीद बांधली.
 यानंतरही सात वर्षे गेली. १३१८ मध्ये मुबारिक खिलजी पुन्हा देवगिरीवर चालून आला. पण तरीही हरपाळदेवाची तयारी नव्हती. त्याचा पराभव करून त्याला मुबारिकने जिवंत सोलून मारले. तेथून मुबारिक वरंगळला गेला. तेथे प्रतापरुद्राचीही तीच स्थिती होती. हिंदू एक तर पूर्ण बेसावध असत किंवा सावध असूनही त्यांचे कर्तृत्व शून्य झाल्यामुळे त्यांना राज्य, लष्कर, यांची संघटना करता येत नव्हती. परिस्थितीचे ज्ञान करून घ्यावे, स्वपरबलाबल जाणावे, उपायचिंतन करावे हे सामर्थ्यच त्यांच्या ठायीचे नष्ट झाले होते. या वेळी प्रतापरुद्राचा पराभव झाला; पण त्यामुळे त्याला काही उमज पडला, असे नाही. १३२१ साली ग्यासुद्दीन तघलखाने आपला मुलगा जौनाखान याच्या आधिपत्याखाली वरंगळवर फिरून फौज धाडिली तेव्हा प्रतापरुद्र काय करीत होता ? आर. सी. मजुमदार म्हणतात, 'दिल्लीला बंडाळ्या माजलेल्या ऐकून त्याने सुलतानी जू झुगारून दिले; खंडणी देण्याचे नाकारले आणि वारंवार येणाऱ्या सुलतानी आक्रमणापासून स्वधर्म, स्वदेश, यांचे रक्षण करण्यासाठी हिंदूंची संयुक्त आघाडी निर्माण करण्याऐवजी त्याने लष्करी स्वाऱ्या करून भोवतालची राज्ये जिंकण्याचा उद्योग आरंभिला ! राजनैतिक विद्या व