पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

वयामुळे उभयकुलांचा उद्धार होईल, या व असल्या गहन व समाज जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समस्या सोडविण्यात येथल्या धर्मशास्त्रज्ञांची बुद्धी चोवीस तास गुंतलेली असल्यामुळे, मंदिरविध्वंस, स्त्रियांवरील अत्याचार, पारतंत्र्य असल्या क्षुल्लक प्रश्नांचे अर्थ आकळून घेण्यास त्यांना वेळच नव्हता ! काही संन्यासी, संत यांना वरील गहन समस्यांत रस वाटत नव्हता. पण त्यांना इहलोकीच्या कोणत्याच वस्तूविषयी गृह, वित्त, धन, दारा, सुत, स्वराज्य, साम्राज्य, शत्रू, मित्र, यांपैकी कशाविषयीही- रस नव्हता. त्यामुळे अल्लाउद्दिन आणि रामदेवराव यांत त्यांना भेद वाटत नव्हता. इतर काही बुद्धिमंतांनी आपली दृष्टी साहित्याकडे वळवून एका उपमेत ऐशी प्रकार कसे होतात हे सांगण्यात, नाटकातील नायिकांचे नवऱ्याच्या सहवासात राहणारी, जिचा नवरा प्रवासास गेला आहे अशी, जिच्यावर रमणाचे प्रेम आहे अशी, नाही अशी, असे भेद ठरविण्यात आणि यांत पुन्हा नवबाला, प्रौढा, गतवयस्का या दृष्टीने प्रत्येक प्रकाराचे आणखी भेद कसे करता येतील हे पाहण्यात आपली सर्व प्रज्ञा गुंतविलेली होती. मिळून काय, राजकारणाविषयी स्वराज्य, स्वातंत्र्य यांविषयी सर्वं उदासीन होते. त्यामुळे उत्तर हिंदुस्थान गेला, चितोडही पडले, देवगिरीचे साम्राज्य कोसळून पडले तरी दक्षिणेत कोणाचे डोळे उघडले नाहीत.

आणि राजांचे :
 देवगिरीच्या रामचंद्ररावाचा पहिला पराभव १२९६ मध्ये झाला. त्यानंतर त्याने नियमित खंडणी दिली नाही म्हणून मालिक काफूरने वारी करून त्याला कैद करून दिल्लीला नेले (१३०४). आगामी आपत्तीची कल्पना येण्यास हे पुरेसे होते; पण १३०९ मध्ये मलिक काफूर वरंगळवर चालून आला तरी त्याला तोंड देण्याची कसलीच तयारी तेथे नव्हती. रामचंद्ररावाने या वेळी दक्षिणेतील इतर राज्ये बुडविण्यास मनोभावे साह्य केले. यात आपण धर्मद्रोह करीत आहो असे त्याला मुळीच वाटले नाही. अर्थातच वरंगळच्या प्रतापरुद्राचा पराभव झाला आणि प्रचंड लूट वेऊन काफूर परत गेला. १३११ मध्ये तो पुन्हा दक्षिणेत आला. आता द्वारसमुद्राच्या वीर बल्लाळावर त्याला धाड घालावयाची होती. वीर बल्लाळ हा रामचंद्ररावाचा जुना वैरी. तेव्हा ही संधी साधून त्याने काफूरबरोबर साह्यार्थ परशुरामदेव या सुभेदाराला विपुल