पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१२१
 


विजयनगर :
 विजयनगरच्या संस्थापकांनी व नेत्यांनी मात्र हे अद्वैत पुरेपूर जाणले होते. मुस्लीमांचे आक्रमण हे हिंदुधर्मावरील भयानक संकट आहे हे तर त्यांनी ओळखलेच; पण त्याबरोबर या धर्माच्या रक्षणासाठी स्वराज्याखेरीज अन्य उपाय नाही हे महान सत्य त्यांनी ध्रुवासारखे सतत दृष्टीसमोर ठेविले होते. त्यामुळे त्यांना समाजसंघटना कशी करता आली व त्या घोर आपत्तीपासून हिंदुसमाजाचे कसे रक्षण करता आले ते आता पाहावयाचे आहे.

हिंदू पंडितांचे उद्योग :
 विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना इ. स. १३३६ साली झाली. वर सांगितलेच आहे की तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत मुस्लीमांनी उत्तर हिंदुस्थान जिंकले असले तरी दक्षिणेत त्यांचा प्रवेश झाला नव्हता. पण चौदाव्या शतकाच्या प्रारंभी तसा प्रवेश होताच अवघ्या १५-२० वर्षात देवगिरी यादव, द्वारसमुद्र- होयसळ यादव, वरंगळ- काकतीय व मदुरा- पांड्य या चारही बलाढ्य साम्राज्यांचा त्यांनी विध्वंस करून टाकला. डॉ. एस्. कृष्णस्वामी अय्यंगार म्हणतात की 'मुबारिक खिलजीने देवगिरीचा नाश करून तेथे लष्करी तळ केला हे दक्षिणेतील सत्तांचे डोळे उघडण्यास पुरेसे अंजन होते. वास्तविक हेही अंजन हवे होते असे नाही.' त्यांचा भावार्थ असा की, उत्तर हिंदुस्थानातील मुस्लीम आक्रमण, अत्याचार व त्यांच्या साम्राज्याची स्थापना या घटनांवरून दाक्षिणात्य सत्तांना मुस्लीम आक्रमणाचे स्वरूप व त्याचा अर्थ पूर्वीच कळावयास हवा होता. पण या काळात ते अशक्य होते. कोणत्याही घटनेचा अर्थ आकळण्याची ऐपतच त्या वेळी हिंदुसमाजधुरीणांत राहिली नव्हती. आत्मा व परमात्मा यांत पूर्ण अद्वैत आहे की विशिष्ट अद्वैत आहे, एकादशीसारख्या उपवासाला तांबडा भोपळा चालेल की दुध्या, अनंतव्रताताला लाडू चालतील की घीवर, स्नानसंध्या तीन वेळा करावी की दोन वेळा, गंध आडवे लावावे की उभे, अस्पृश्यांचा वारा अंगावर आला तर कोणते प्रायश्चित्त घ्यावे, सावली पडली तर कोणते आणि प्रत्यक्ष स्पर्श झाला तर कोणते, जेवताना अंगावर एक वस्त्र असावे की दोन, पाय ओले असावेत की कोरडे, मुलीचे लग्न आठव्या वर्षी करावे की सव्वा आठव्या वर्षी, यांपैकी कोणत्या