पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

त्याचे हे प्रायश्चित्त आहे. अजूनही त्याच भ्रांतीमुळे तशीच फळे ते भोगीत आहेत. आत्मा आणि परमात्मा यांचा अभेद यांचे ऐक्य, त्यांनी जाणले नसते तरी फारसे बिघडले नसते. अद्वैत तत्त्वज्ञानाची उपासना त्यांनी केली नसती तरी धर्महानी झाली नसती. पण स्वराज्य व स्वधर्म यांचे अद्वैत येथील शास्त्रज्ञांनी जाणून ते लोकमानसात दृढमूल करावयास हवे होते. पण त्यांनी नेमके उलट केले. जीवशिवांच्या अभेदावार सर्व शक्ती खर्च केली आणि स्वराज्य- स्वधर्माच्या अद्वैताची संपूर्ण उपेक्षा केली. म्हणूनच हिंदुधर्म हा संघटनतत्त्व होऊ शकला नाही. आणि त्यामुळे हिंदुसमाज छिन्नभिन्न झाला. तो समाजच राहिला नाही.

वैयक्तिक कर्तृत्व :
 महंमद घोरी, कुतुबुद्दिन ऐबक, अल्तमश, बल्बन, अल्लाउद्दिन खिलजी, बाबर, यांच्याशी वैयक्तिक दृष्टीने तुलना करता पृथ्वीराज चव्हाण, चक्रवर्ती हम्मीर, राणा कुंभ, राणा संग हे रजपूत महावीर लवमात्र कमी नव्हते. आणि त्याग, चारित्र्य, प्रजाहितदक्षता या गुणांत तर ते शतपटीने श्रेष्ठ होते. अकबर हा मुस्लीमांतील मोठा बादशहा. त्याच्याशी तुलना केली तर महाराणा प्रतापसिंह हे कर्तृत्वाच्या दृष्टीने मुळीच कमी नव्हते. पण अकबर हा सर्व उत्तर हिंदुस्थानचा बादशहा झाला व राणाजींना आयुष्यभर प्राणांतिक झगडा करूनही शेवटी चितोड घेता आला नाही ! याचे कारण हिंदुसमाज किंवा नुसते रजपूत सुद्धा राणाजींच्या पाठीशी नव्हते, नव्हे तेच अकबराचे सेनापती होऊन राणाजींच्या व हिंदुसमाजाच्या नाशास प्रवृत्त झाले होते, आणि तरीही हिंदुधर्मशास्त्र त्यांना भ्रष्ट म्हणत नव्हते, हे होय. उलट अकबराच्या मागे, हिंदूंशी प्रसंग असला म्हणजे तरी, सर्व मुस्लीम समाज उभा असे. म्हणजे तुलनेने पाहता मुस्लीम समाज हा समाज होता. त्यामुळेच वैयक्तिक कर्तृत्वात राणाजींच्या पेक्षा विशेष आधिक्य नसूनही अकबर सुलतान होऊ शकला. मायभूमीचे स्वातंत्र्य हे धर्माच्या प्रगतीचे एक लक्षण होय असे हिंदुधर्मशास्त्राने मानले असते, स्वातंत्र्य व धर्म यांत अद्वैत मानले असते तर या भूमीत कलियुग आलेच नसते.