पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
११९
 

भिन्न रजपूत जमाती सरळ आपापल्या देशी निघून गेल्या. बलाढ्य अशा संगाच्या जोखडाखालून बरे सुटलो, असे जणू त्यांना वाटले. (हिस्टरी ॲण्ड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल- संपादक डॉ. मुनशी, खंड ६ वा, पृ. ३४६) डॉ. दत्त म्हतात की, संग हा रजपुतांच्या भिन्न जमातीत राष्ट्रैक्याची जोपासना करू शकला नाही. म्हणून हे अपयश आले. हे तर खरेच आहे. 'रजपूत तेवढा मेळवावा' असा महामंत्र त्यांना कोणीच दिला नव्हता. आणि ही भावना एकाएकी उद्भवणे कठिणच असते. पण धर्मांवर तर सगळ्यांचे प्रम होते ना? निष्ठा, भक्ती, अभिमान ही होती ना? होय. हे सर्व होते. पण धर्म म्हणजे काय हेच त्यांना माहीत नव्हते. हे एक संघटनतत्त्व आहे, त्याचा स्वातंत्र्याशी संबंध आहे, इतर अभिमान व मानापमान त्या निष्ठेत विलीन केले पाहिजेत, असे त्यांना कोणी शिकविलेच नव्हते. त्यावेळचे धर्मशास्त्रज्ञ व त्यांचे धर्मशास्त्र केवळ व्यक्तिधर्माला वाहिलेले होते, समाजधर्म ते जाणीतच नव्हते. अशा धर्मशास्त्रापायी विघटनेवाचून दुसरे काय होणार ?
 मॅझिनीचे राजकीय तत्त्वज्ञान विशद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्याच्या चरित्राच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, राजकारणाला धर्म आहे व धर्माला राजकारण आहे, हे महत्-सत्य, हे कालदेशाबाधित सत्य ओळखून प्रत्येकाने परमेश्वरी कर्तव्य म्हणून स्वातंत्र्यलढ्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. कारण व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या व मनुष्यजातीच्या सर्व प्रकारच्या उन्नतीचे मुख्य साधन राजकीय स्वातंत्र्य हे आहे. म्हणून त्याचे संपादन व संरक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे प्रथम कर्तव्य होय. ती परमेश्वराची आज्ञाच आहे. राजधर्म सर्व धर्मांत श्रेष्ठ असे म्हणण्यात पितामह भीष्मांचा जो अभिप्राय आहे तोच मॅझिनीच्या मनात होता, असे यावरून दिसते. पण निवृत्ती, व्रत- वैकल्ये, केवलभक्ती, जातिभेद, चातुर्वर्ण्य, पंथभेद या हिंदुधर्मशास्त्रातील घातक तत्त्वांमुळे राजधर्माचा हिंदूंना विसर पडला व ते परकीय आक्रमणास बळी पडले, आणि त्यामुळे अंती त्यांचा धर्मही गेला व स्वातंत्र्यही गेले. लक्षावधी लोकांना मुस्लीमांनी सक्तीने बाटविले, लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार केले, त्यांना दासी म्हणून परदेशात विकले व आपल्या जनानखान्यात घातले. सहस्रावधी मंदिरांचा व मूर्तीचा विध्वंस केला व शेकडो धर्मग्रंथ, धर्मपीठे व धर्मप्रवक्ते यांना जाळून टाकले. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद हिंदूंनी जाणला नाही