पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

असणेच शक्य नाही. त्याच्या सोमवार- एकादश्यांना व प्रयाग- काशीच्या वाऱ्यांना काडीमात्र अर्थ नाही. हे सर्व राजे स्वतःला क्षत्रिय म्हणवीत असत. महाभारतकारांच्या मते क्षत्रियाचा धर्म कोणता? क्षत्रियाला शत्रूच्या नाशावाचून दुसरा धर्म नाही. (उद्योग- २१-४३) युद्धात जय मिळवणे हाच क्षत्रियाचा व्यवसाय होय. (सभा, ५५,७) राज्य जिंकण्याच्या कामी कोणी अडथळा करील तर त्याचा वध करणे हा क्षात्रधर्म होय. (शांति १२,१०,७) असे क्षात्रधर्माचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. पण मानसिंग, जसवंत सिंह हे शत्रूचे दास्य पतकरूनही स्वतःला श्रेष्ठ क्षत्रिय म्हणवीत! अत्यंत विपरीत गोष्ट अशी की चितोडच्या महाराण्यांपुढे नमण्यात किंवा शिवछत्रपतींच्या सेवेत त्यांना कुलाभिमान गेला असे वाटत असे, अपमान वाटत असे. पण वंशपरंपरा मोंगलांची गुलामी पतकरण्यात वा त्यांना कन्या देण्यात, कुलाभिमान दुखविला असे वाटत नसे. स्वराज्य व स्वधर्म यांची फारकत झाल्याचे हे लक्षण होय. असा धर्म समाजसंघटना करण्यास सर्वस्वी अयोग्य ठरतो. याच काळात मुस्लीमांनी अनेक वेळा 'धर्म' हे संघटनतत्त्व मानले होते. बाबर व संग यांचे खानव्याला युद्ध झाले त्यात प्रथम बाबराची सेना वीस हजारच होती. पण संगाने पूर्वी पराभूत करून सोडून दिलेले सर्व मुस्लीम त्याला मिळाले व ती सेना लाखावर गेली.

स्वराज्यद्रोही तो धर्मद्रोही :
 डॉ. एस् दत्त यांनी संग व बाबर यांच्या सेनांचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे : बाबराजवळ १५००० च सैन्य होते. पण मरू किंवा मारू अशा त्वेषाने ते पेटले होते. आणि ते दृढ व संघटित असे होते. उलट संगाच्या सैन्यात दृढनिष्ठा व संघटना या दोहींचा अभाव होता. संगाच्या सैन्यात हिंदू होते तसेच मुसलमानही होते. पण मुस्लीमांच्या चित्तात अफगाण साम्राजाच्या आकांक्षा होत्या. त्यामुळे ते मनापासून लढलेच नाहीत. तरी त्यांनी संगाचा पक्ष घेतल्यामुळे बाबर त्यांना धर्मभ्रष्ट म्हणतो. (त्याच्या मनात स्वराज्य व स्वधर्म यांची फारकत झालेली नव्हती हे यावरून स्पष्ट आहे.) शिवाय संगाच्या सैन्यात जे हिंदू होते ते केवळ जुलमाचा रामराम म्हणून आले होते. कारण संगाचे आधिपत्य व श्रेष्ठत्व त्यांना मनातून सहन होत नव्हते. लढाई संपताच